

परीक्षा काळातच धावपळ
शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा भार
जव्हार, ता. २५ (बातमीदार)ः तालुक्यातील शिक्षकांवर मतदान प्रक्रियेतील अशैक्षणिक कामांचा भार वाढला आहे. त्यामुळे जव्हारसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्याची भीती शिक्षक संघटनांमधून व्यक्त केली जात आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा संपत असताना शिक्षकांची धावपळ कमी होण्याऐवजी अधिकच वाढत आहे. उत्तरपत्रिका तपासणी, निकालाची तयारी, नंतर शासनाकडून राष्ट्रीय जनगणना, मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण (बीएलओ) कामांची सक्ती करण्यात आली आहे. या दुहेरी जबाबदाऱ्यांने शिक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एप्रिल हा शैक्षणिक वर्षाचा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात वार्षिक परीक्षांचे नियोजन, देखरेख, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यातच पॅट परीक्षेचे अतिरिक्त ओझेही शिक्षकांवर आहे. त्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या शिक्षकांवर दबाव आला आहे.
-----------------------
शिक्षकांसमोरील आव्हाने
एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेसाठी तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी शेकडो शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी शिक्षकांना घरोघरी जाऊन माहिती संकलन करावी लागत असल्याने शालेय वेळापत्रक पूर्णपणे विस्कळित होत आहे. शिक्षकांना सकाळी शाळेत अध्यापन आणि परीक्षांची जबाबदारी पार पाडावी लागते. दुपारनंतर जनगणना किंवा बीएलओ कामासाठी फिरावे लागते. या दुहेरी ताणामुळे मानसिक थकवा वाढत असून, उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात त्रुटी राहण्याची शक्यता वाढली आहे.
-----------------------------------
नियमावलीचा भंग
आरटीई कायद्यानुसार शिक्षकांना केवळ जनगणना, निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या मर्यादित कामांसाठीच वापरण्याची तरतूद आहे. मात्र सध्या विविध सर्वेक्षणे आणि इतर कामांसाठीही शिक्षकांना नियुक्त केले जात असल्याने नियमावलीचा भंग होत असल्याचा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
---------------------------------
जव्हार तालुक्यात शिक्षकांना बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती केल्याने मतदान प्रक्रिया सांभाळून विद्यादान करणे मोठे जिकिरीचे वाटत आहे. त्यामुळे या कामासाठी वेगळी टीम तयार करावी.
- सखाराम पवार, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.