

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अत्याधुनिक उपचार सुविधांना गती
प्रत्यारोपण व मेंदू शस्त्रक्रियांसाठी नव्या सुविधा उभारणार : मंत्री हसन मुश्रीफ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यात वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक उपचार सुविधा उभारण्यावर शासनाने भर दिला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पुढील दोन वर्षांत हृदय, यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासह मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, की सध्या राज्यात ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात मोठा विस्तार झाला असून, नुकत्याच १० नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे एक हजार ‘एमबीबीएस’च्या जागांची भर पडली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या सहकार्याने पदव्युत्तर (पीजी) जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी वसतिगृह, भोजन व्यवस्था आणि संलग्न रुग्णालयांची गुणवत्ता सुधारण्यावरही शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्करोग उपचारासाठी राज्यात त्रिस्तरीय (एल-१, एल-२, एल-३) व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. एल-१ स्तरावर टाटा मेमोरियल रुग्णालयासारख्या विशेष संस्थांचा समावेश असून, एल-२ स्तरावर सुमारे १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचार सुविधा विकसित केल्या जात आहेत. एल-३ स्तरावर इतर रुग्णालयांमध्येही उपचार व्यवस्था मजबूत केली जात आहे. त्यामुळे कर्करोगावरील उपचार अधिक व्यापक आणि प्रभावीपणे उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
‘हाफकिन’मध्ये लस उत्पादनासाठी प्रयत्न
हाफकिन संस्थेत पुन्हा मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. संस्थेबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील रिचर्डसन अँड क्रूडास कंपनीच्या सुमारे ११ एकर जागेवर अत्याधुनिक कर्करोग संशोधन व उपचार केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यास सुचवले. यासंदर्भात राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.