सफाई कर्मचाऱ्यांवर उष्माघाताचे संकट

सफाई कर्मचाऱ्यांवर उष्माघाताचे संकट
Published on

उष्माघाताने सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू?

दुसरा रुग्णालयात उपचाराधीन; आरोग्य सुविधांचा अभाव उघड

नवी मुंबई, ता. २५ : शहरात वाढत्या उष्णतेचा फटका सफाई कर्मचाऱ्यांना बसत असून उष्माघातामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दुसरा कर्मचारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

नवी मुंबईत वाढलेल्या उष्णतेमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर गंभीर परिणाम होत असून, उष्माघातामुळे एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या कडक उन्हात रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मलेरिया विभागातील कंत्राटी कर्मचारी विवेक सावंत यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांचा मृत्यू झाला. योग्य उपचारासाठी आर्थिक अडचणी आणि ईएसआय व मेडिक्लेम सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सफाई विभागातील रवी डांगळे यांनाही ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
---
कायम कधी होणार?
नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये वर्षांनुवर्षे कंत्राटी कामगार काम करत आहेत. आज ना उद्या प्रशासनामध्ये आपली सेवा कायम होईल, या आशेने या कामगारांनी १५ ते २५ वर्षे काम केले आहे. आजही या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनामध्ये काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
---
महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून मेडिक्लेम, ईएसआय सुविधा मिळावी, यासाठी गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. योग्य उपचार न मिळाल्यामुळे कर्मचारी मृत्यू पावल्यास महापालिका आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
- रवींद्र सावंत, महाराष्ट्र कर्मचारी युनियन, अध्यक्ष, शिवसेना

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com