

विकासाच्या पंचसूत्रीवर भर
उल्हासनगरचा ९९७ कोटींचा ‘स्मार्ट’ अर्थसंकल्प सादर
उल्हासनगर, ता. २५ : शहराच्या विकासाला आधुनिक आणि ‘स्मार्ट’ वळण देण्याचा निर्धार व्यक्त करत, महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी (ता. २५) २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ९९७ कोटी आठ लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर केला. १४.१६ लाख रुपयांच्या शिल्लकीचा हा अर्थसंकल्प पूर्णपणे ‘विकासाची पंचसूत्री’ या संकल्पनेवर आधारित असून, यात पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन आणि शाश्वत विकासाचा समावेश आहे.
महापालिकेत सध्या स्थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे, तब्बल २९ वर्षांनंतर प्रथमच आयुक्तांनी हा अर्थसंकल्प थेट महापौर अश्विनी निकम यांच्याकडे महासभेत सुपूर्द केला. या ऐतिहासिक क्षणामुळे पालिका वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या महसूलवाढीसाठी कठोर उपाययोजना सुचवतानाच, सामाजिक कल्याणासाठी भरीव तरतूद केली आहे.
मालमत्तांचे जीआयएस आधारित पुनर्मूल्यांकन आणि पाणीपट्टीसाठी मीटर सक्ती करून उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. शाळांचे अद्ययावतीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी विशेष निधी देण्यात येणार आहे. महिला, दिव्यांग आणि तृतीयपंथींच्या कल्याणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. तसेच शहर शाश्वत आणि हायटेक करण्यासाठी सौरऊर्जा व डिजिटल सेवांवर भर देण्यात येणार आहे.
३० मार्चला सविस्तर चर्चा होणार
अर्थसंकल्पीय सभा सुरू होताच शिवसेना नगरसेवक अरुण आशान यांनी एक महत्त्वाची मागणी सभागृहात मांडली. महापालिकेत अनेक नवीन नगरसेवक निवडून आले असून, त्यांना अर्थसंकल्पातील तांत्रिक मुद्दे आणि निधीच्या तरतुदींचा सखोल अभ्यास करता यावा, यासाठी वेळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना अभ्यासपूर्ण चर्चा करता यावी, या उद्देशाने त्यांनी ३० मार्चपर्यंत सभा तहकूब करण्याची विनंती केली. या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने महापौरांनी अर्थसंकल्पीय सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. आता ३० मार्चला होणाऱ्या सभेत या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा होऊन त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
२९ वर्षांनंतरचा ऐतिहासिक क्षण
उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात तब्बल २९ वर्षांनंतर एक लक्षवेधी क्षण नोंदवला गेला. स्थायी समिती गठित न झाल्यामुळे यंदा पारंपरिक पद्धतीला छेद देत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी थेट महापौर अश्विनी निकम यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. सामान्यतः स्थायी समितीमार्फत मांडला जाणारा अर्थसंकल्प या वेळी थेट महासभेसमोर आला, हीच या प्रक्रियेची विशेषता ठरली. या बदलामुळे शहरात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पालिकेच्या सत्तासंतुलनात होत असलेल्या बदलांचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.
अर्थसंकल्पाचा लेखाजोखा
एकूण खर्च : ९९७.०८ कोटी रुपये
अपेक्षित उत्पन्न : ९०६.४१ कोटी रुपये
आरंभीची शिल्लक : ९०.८१ कोटी रुपये
शिल्लक : १४.१६ लाख रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.