

ठाण्यात रामनवमीनिमित्त बाजारपेठांमध्ये लगबग
तरुणांमध्ये बाइक फ्लॅगची क्रेझ; वेशभूषेसाठी पालकांची नोंदणी
ठाणे, ता. २५ (बातमीदार) : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात सर्वत्र ‘जय श्रीराम’चा गजर घुमत असून, सण साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडी श्रीरामाचे नाव असून, शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. चैत्र शुक्ल पक्षातील नवमीला भगवान श्रीरामांचा जन्म झाल्याची मान्यता आहे. यंदा रामनवमी गुरुवारी (ता. २६) साजरी होत असून, यानिमित्ताने ठाण्यातील बाजारपेठांमध्येही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी श्रीरामाचे फोटो, प्रिंटेड भगवे झेंडे, टी-शर्ट तसेच श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
यंदा विशेष आकर्षण ठरत आहेत ते बाइकवर लावण्यासाठी तयार केलेले प्रिंटेड झेंडे. श्रीरामांची प्रतिमा असलेले हे झेंडे बाइकच्या आरशाजवळ सहज बसवता येतात. प्लास्टिकपासून तयार केलेले असल्याने ते मजबूतही आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये या झेंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने काही वस्तूंच्या दरात वाढ झाल्याची माहिती ठाण्यातील विक्रेते अरविंद साबू यांनी दिली. तरीही ग्राहकांचा उत्साह कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारात श्रीरामांच्या प्रतिमेचे टी-शर्ट २०० ते ४०० रुपयांदरम्यान, टोपी १०० ते १५० रुपये, तर शाल २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. जांभळी नाका परिसरातील विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या टी-शर्टला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय ‘राजा राम’ स्वरूपातील दागिने आणि वेशभूषेसाठी सुमारे ५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र वेशभूषा भाड्याने घेण्याचा पर्याय अधिक परवडणारा ठरत असल्याने पालकांकडून आगाऊ नोंदणीही करण्यात येत आहे, अशी माहिती वेशभूषा विक्रेता कांचन सुर्वे यांनी दिली.
महागाईचा किंचित फटका
ठाणे आणि कळवा परिसरातील रामलीला कॉस्ट्यूम दुकानांमध्ये विविध प्रकारचे पोशाख भाड्याने उपलब्ध असून, लहान मुलांसाठी ५०० रुपये तर मोठ्यांसाठी ७०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. या पोशाखांसोबत विग, रुद्राक्ष माळ, दागिने, धनुष्यबाण तसेच हनुमानासाठी मुकुट आणि गदा अशा साहित्याचाही समावेश असतो. रामनवमीच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर झेंडे, टी-शर्ट आणि वेशभूषांना मोठी मागणी असल्याचे विक्रेता आरती अग्रहरी आणि रविकांत अग्रहरी यांनी सांगितले.
साहित्याचे दर (अंदाजे)
बॅच : १२० रुपये (डझन)
झेंडे : ३० ते १,००० रुपये
कापडी फलक (५×७ फूट) : ५०० रुपये
मफलर : १२ ते १०० रुपये
दागिने : सुमारे ५०० रुपये
कपडे : ३५० ते ४५० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.