मिठी नदीच्या साफसफाई ४ एप्रिलपासून

मिठी नदीच्या साफसफाई ४ एप्रिलपासून
Published on

मिठी नदीची साफसफाई ४ एप्रिलपासून

नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मिठी नदीच्या साफसफाईसाठी अखेर कंत्राटदार मिळाले आहेत. दोन कंत्राटदारांनी निविदेला प्रतिसाद दिला असून, ४ एप्रिलपासून साफसफाईस सुरुवात होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

१८ मार्चला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे गटनेते आश्रफ आझमी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून मिठी नदीची सफाई झाली नाही तर मुंबई जलमय होईल, अशी भीती व्‍यक्त केली होती. आझमी यांच्या हरकतीच्या मुद्द्यावर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थायी समितीत मिठी नदीच्या सफाईचे सादरीकरण केले.

पालिकेच्या २४ पैकी २० प्रभागांत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. फक्त मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी निविदा प्रक्रियेस कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळत नव्हता. आता दोन कंत्राटदार आले असून, दोन दिवसांत सगळी प्रक्रिया अंतिम करून रविवारपासून गाळ उपसा करण्यास सुरुवात होईल. ४ एप्रिलपासून मिठी नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामास वेग येईल. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी नऊ लाख ६० हजार ७१३ टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट असून, आठ हजार ७५० टन गाळ उपसा करण्यात आला आहे.

नालेसफाईवर एआयचा वॉच
नालेसफाईच्या कामावर आता एआय तंत्रज्ञानाचा वॉच राहणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर गाळ अपलोड करताना व्हिडिओ नसल्यास संबंधित कंत्राटदाराची देयके रोखण्यात येतील. एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने गेल्या वर्षी कंत्राटदारास १२ ते १५ कोटींचा दंड आकारला होता. त्यामुळे एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे अभिजित बांगर यांनी या वेळी सांगितले. छोट्या नाल्यातील गाळ उपशाचे काम सुरू असून, प्रत्येक ट्रिपचा डेटा आल्यानंतर पेमेंट केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गाळ उपसा करण्यावर नजर ठेवली जात असून, दोन ते तीन दिवसांत वॉर रूम कार्यान्वित होईल, असेही ते म्हणाले.

...तर कारवाई कशी करणार?
गाळ वाहून नेण्यासाठी डम्पर वापरले जातात; परंतु डम्परच्या नंबर प्लेटवर माती असते. मग ते डम्पर कसे ट्रॅक करणार, असा प्रश्न मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केला. गाळ वाहून नेणाऱ्या डम्परच्या नंबर प्लेटवर मुद्दाम माती लावली असेल तर दंडात्मक कारवाई होणार, असेही ते म्हणाले.

मिलन सबवेबाबत तोडगा निघणार
के पश्चिम विभागात गेल्या वेळचा कंत्राटदार काम करणार आहे. मोगरा नाला, ओशिवरा नाला हे मोठे नाले असून, दरवर्षी अंधेरी सबवे जलमय होतो. त्यावर काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा ठाकरे सेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी केली. अंधेरी सबवेत ५५ मिमी पाऊस पडला तर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. ७५ मिलीमीटर पाऊस पडला तर अडचण होते आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे बांगर यांनी सांगितले.
----
देवनार, कांजूरमध्ये गाळ टाकणार
मिठी नदीसह अन्य नाल्यातील उपसा केलेला गाळ टाकण्यासाठी देवनार व कांजूर डम्पिग ग्राउंडचा पर्याय शोधला जात आहे.
---

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com