

मुलुंड मेट्रो-४ अपघातासाठी कंत्राटदार जबाबदार
‘एमएमआरडीए’च्या चौकशी अहवालात ठपका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुलुंडमधील एलबीएस मार्गावर ‘वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या मेट्रोच्या खांबांवरील अंदाजे अडीच मेट्रिक टनाचा सिमेंटचा पॅरापेट कोसळून अपघात झाला होता. हा अपघात कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे झाल्याचा ठपका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. संबंधित कंत्राटदार उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि इटालियन कंपनी अस्ताल्डीच्या संयुक्त उपक्रमाचा (आरएजेव्ही) भाग आहे.
सिमेंटच्या पॅरापेटचा तात्पुरता आधार काढल्यामुळे घटना घडल्याचा निष्कर्षही समितीने नोंदवला आहे. ही दुर्घटना डिझाईन किंवा साहित्यातील कोणत्याही त्रुटीमुळे झाली नसल्याचेही म्हटले आहे. या अहवालानुसार मार्गिकेच्या या भागाच्या कामात कोणतीही संरचनात्मक कमतरता, दोष किंवा कारागिरीतील त्रुटी नाही. तर ‘आरएजेव्ही’च्या एका वेल्डरने नुकत्याच बांधलेल्या सिमेंटच्या पॅरापेटचे तात्पुरते आधार लिंमेटने जोडणी करण्याआधीच काढून टाकल्यामुळे हा अपघात घडला. तेच मूळ कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. कार्यपद्धतीचे पालन न करणे, असुरक्षित वर्तन आणि पर्यवेक्षणाच्या अभावासह अनेक चुकांसाठी आरएजेव्हीला जबाबदार धरण्यात आले आहे. आधार काढण्यापूर्वी कोणतीही लेखी परवानगी किंवा अभियांत्रिकी पडताळणी झाली नव्हती. तसेच तोडणीचा क्रम पाळला गेला नव्हता. संरचनात्मकदृष्ट्या पूर्ण झालेले भाग आणि अपूर्ण भाग यांच्यात फरक करण्यासाठीची कोणतीही प्रणाली अस्तित्वात नव्हती. पॅरापेट सुरक्षित करण्यापूर्वीच आधार काढल्याचे एमएमआरडीएच्या समितीने अहवालात म्हटले आहे.
प्रकल्पांच्या संरचनात्मक सुरक्षा तपासणीची मागणी
अपघातादरम्यान घटनास्थळी कंपनीची कोणतीही व्यक्ती उपस्थिती नव्हती, या त्रुटीसाठी आरजेव्हीराजवर पाच कोटी, तर सल्लागार असलेल्या डीबी, हिल इंटरनॅशनल आणि लुई बर्जर यांच्या समूहाला एक कोटी रुपयांचा दंड तसेच १८ फेब्रुवारीला त्यांच्या सेवा समाप्त केल्याचेही अहवालात म्हटले आहे. या अपघातानंतर मुंबईतील सर्व मेट्रो प्रकल्पांच्या संरचनात्मक सुरक्षा तपासणीच्या मागणीसाठी वकील रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ‘एमएमआरडीए’ला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.