

आजारी महिला घरात असतानाच ठोकले सील
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अजब कारभार
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीचा अतिउत्साह एका आजारी महिलेच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या घाईत असलेल्या पालिकेच्या पथकाने घराची कोणतीही शहानिशा न करता आत महिला झोपलेली असतानाच घराला बाहेरून सील ठोकले. यामुळे संबंधित महिला तब्बल सहा तास घरात कोंडून राहिली. या अमानवीय प्रकारामुळे पालिकेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत असून, याचे तीव्र पडसाद महासभेतही उमटले आहेत.
कल्याण पश्चिमेकडील डॉ. आंबेडकर रोडवरील दत्तप्रसाद अपार्टमेंटमध्ये सफिना पटेल या भाड्याने राहतात. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या घरात विश्रांती घेत होत्या. त्यांचा मुलगा नोकरीच्या मुलाखतीसाठी बाहेर जाताना जाळीच्या दरवाजाला कुलूप लावून गेला होता, मात्र मुख्य लाकडी दरवाजा आतून उघडाच होता. करवसुली पथकाने तिथे पोहोचल्यावर आत कोणी आहे की नाही याची खात्री न करताच थेट जाळीच्या दरवाजाला सील लावून नोटीस चिटकवली. स्थानिक रहिवाशांनी आत आजारी महिला असल्याचे सांगूनही कर्मचाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सहा तासांनंतर जेव्हा सफिना यांना जाग आली, तेव्हा आपण घरात कैद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरमालकाने हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अखेर सील तोडण्यात आले.
महासभेत प्रशासनाला घेरले
या घटनेचे पडसाद पालिकेच्या महासभेत उमटले. सामान्यांच्या घराचा कर थकीत असल्यास त्यांना अशा प्रकारे अमानवीय वागणूक दिली जाते. मग ३५० कोटींची थकबाकी असलेल्या एनआरसी कंपनीवर कारवाई का होत नाही, असा जळजळीत सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. अदाणी समूहाला जागा विकणाऱ्या एनआरसीला अभय आणि सामान्यांना त्रास, अशा दुजाभावावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.