जुनी प्रतिजैविके पुन्हा प्रभावी करण्याची नवी दिशा

जुनी प्रतिजैविके पुन्हा प्रभावी करण्याची नवी दिशा
Published on

जुनी प्रतिजैविके पुन्हा प्रभावी करण्याची नवी दिशा
आयआयटी मुंबईतील संशोधकांचे नवे संशोधन चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः औषधांना प्रतिरोधक बनलेल्या जीवाणूंमुळे वाढत चाललेल्या प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स)च्या संकटावर मात करण्यासाठी आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी एक अभिनव डीएनएआधारित उपचार पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमुळे जुनी प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) पुन्हा प्रभावी ठरू शकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
न्यूमोनिया, क्षयरोग, मूत्रमार्ग व रक्तातील संसर्ग यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो; मात्र त्यांचा अति व अनियंत्रित वापर झाल्यामुळे अनेक जीवाणूंनी या औषधांविरोधात प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये जगभरातील अनेक प्रयोगशाळांनी प्रतिजैविके निष्प्रभ ठरत असल्याचे नोंदवले आहे.
याच पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईतील प्रा. रुची आनंद आणि प्रा. पी. आय. प्रदीपकुमार यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी नवीन औषधे शोधण्याऐवजी विद्यमान प्रतिजैविके अधिक प्रभावी करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या संशोधनात ‘अ‍ॅप्टामर्स’ नावाच्या डीएनएच्या सूक्ष्म साखळ्यांचा वापर करण्यात आला आहे.
हे अ‍ॅप्टामर्स जीवाणूंमध्ये आढळणाऱ्या ‘ईआरएम’ नावाच्या विकरांना (एन्झाइम्स) अडथळा निर्माण करतात. सामान्यतः हे विकर प्रतिजैविकांना निष्प्रभ करतात; मात्र अ‍ॅप्टामर्स या विकरांच्या कार्यात अडथळा आणतात, ज्यामुळे प्रतिजैविके पुन्हा जीवाणूंवर प्रभावी ठरतात.
संशोधकांनी पुढे ‘लिपोसोम’ नावाच्या सूक्ष्म कणांचा वापर करून हे अ‍ॅप्टामर्स जीवाणूंमध्ये पोहोचवण्याची पद्धत विकसित केली. या पद्धतीमुळे अ‍ॅप्टामर्सचे शोषण ९० टक्क्यांहून अधिक वाढल्याचे दिसून आले. विशेषतः ‘स्टॅफिलोकोकस ऑरियस’ या प्रतिरोधक जीवाणूंवर केलेल्या प्रयोगांत, प्रतिजैविकांसोबत अ‍ॅप्टामर्स वापरल्यास जीवाणूंचा नाश मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळले.

खर्च, वेळ वाचणार
नवीन औषधे विकसित करणे खर्चिक आणि वेळखाऊ असते. त्याऐवजी विद्यमान औषधांची कार्यक्षमता वाढवणे अधिक व्यावहारिक ठरू शकते, असे प्रा. रुची आनंद यांनी सांगितले.

भविष्यात प्रभावी उपचार शक्य
या संशोधनामुळे भविष्यात प्रतिजैविक-प्रतिरोधक संसर्गांवर प्रभावी उपचार शक्य होऊ शकतात; मात्र ही पद्धत प्रत्यक्ष उपचारांमध्ये वापरण्यापूर्वी प्राण्यांवरील प्रयोग व सुरक्षिततेचे सखोल परीक्षण आवश्यक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा
आयआयटी मुंबईतील हे संशोधन यशस्वी ठरल्यास, दीर्घकाळापासून वापरात असलेली प्रतिजैविके पुन्हा प्रभावी बनवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी मोठा दिलासा ठरू शकणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com