

‘सहजीवन’चा गॅस वनवास संपला
पोलिस बंदोबस्तात गॅसजोडणीचे काम पूर्ण
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड परिसरातील सहजीवन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गॅसजोडणीचा प्रश्न अखेर सुटला आहे. स्थानिक जमीनमालकांच्या टोकाच्या विरोधामुळे रखडलेले हे काम महापालिकेच्या अधिकृत पोहोच रस्त्यावरून पोलिस बंदोबस्तात पूर्ण करण्यात आले. यामुळे सोसायटीतील शेकडो रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकत जल्लोष केला.
तीसगाव नाका येथील या सोसायटीला गॅसवाहिनी जोडण्याचे काम सोमवारी (ता. २३) सुरू झाले होते; मात्र लगतच्या जमीनमालकांनी रस्ता खासगी असल्याचे सांगत कामाला मज्जाव केला. यामुळे गॅस कंपनीला काम अर्धवट सोडावे लागले होते. ज्या रस्त्याच्या आधारे १४-१५ वर्षांपूर्वी घरे विकली, त्याच रस्त्यावर आता मालकी हक्क सांगून अडवणूक कशी काय केली जाऊ शकते, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला होता.
नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न निर्माण झाल्याने गॅस कंपनीने पुन्हा महापालिकेकडे दाद मागितली. नगररचना विभागाने तो रस्ता सहजीवन सोसायटीसाठी कायमस्वरूपी मंजूर पोहोच रस्ता असल्याचा लेखी खुलासा केला. या तांत्रिक बाबी स्पष्ट होताच प्रशासनाने रस्ता खोदण्यास परवानगी दिली. अखेर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्तात गॅसवाहिनी टाकण्याचे काम गुरुवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.