

कोकणसाठी २१ गाड्या सुरू असल्याचा रेल्वेचा दावा
दादर-गोरखपूर गाडी नवीन नसल्याचे रेल्वेचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २४) मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी दादर-रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द करून तिच्याऐवजी दादर-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. यावर मध्य रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवल्या जातात. यापैकी सहा गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आठ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, एक गाडी दादर, चार गाड्या कल्याण आणि दोन गाड्या दिवा स्थानकावरून चालवल्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोनानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. २०२१मध्ये ही गाडी दिवा स्थानकामध्ये शिफ्ट करण्यात आली. याचे मुख्य कारण दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करीत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्या वेळेस दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्या वेळेस साधारणपणे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते. त्यातून लोकलच्या वक्तशीरपणावर दुष्परिणाम होत होता. गाडी दिव्यात शिफ्ट केल्यानंतर लोकल ट्रेनच्या संख्येमध्येदेखील वाढ करण्यात आली. यामुळे दिव्यावरून रत्नागिरीला जाणाऱ्या ट्रेनचा वक्तशीरपणादेखील सुधारला असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून गोरखपूरला जाणारी गाडी दादर स्थानकामधून ऑगस्ट २०२२ पासून चालू करण्यात आली. लोकमान्य टिळक टर्मिनसला एलएचबी कोचेसचा मुख्य डेपो बनवल्यानंतर या गाडीला दादर स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात आले. या वेळी या गाडीच्या कोचची संख्यादेखील २२ वरून १७ करावी लागली होती. ही गाडी २०२२ पासून आतापर्यंत सातत्याने दादर स्थानकावरून चालवण्यात येत आहे. आता या गाडीच्या संचालनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून दादर-गोरखपूर एक्स्प्रेस नवीन गाडी असल्याचे नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आला. हे पूर्णतः चुकीचे आहे. दादर-गोरखपूर एक्स्प्रेस गाडी पूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून चालवली जायची.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.