वाचनातून साकारला भावविश्वाचा उत्सव

वाचनातून साकारला भावविश्वाचा उत्सव
Published on

वाचनातून साकारला भावविश्वाचा उत्सव
ठाणे, ता. २६ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘वाचनाचा उत्कट आनंद’ या कार्यक्रमाच्या १३व्या पर्वात महिलांच्या प्रभावी सहभागाने आणि साहित्यिक अभिवाचनाने उपस्थितांना एक वेगळाच सांस्कृतिक अनुभव दिला. महिलांच्या पुढाकारातून साकारलेल्या या कार्यक्रमात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सूत्रे महिलांनी सांभाळली. या सत्रातील प्रमुख अभिवाचक म्हणून प्रसिद्ध निवेदक व ग्रंथपाल तपस्या नेवे आणि तन्वी हर्बलच्या डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांनी आपल्या वाचन कौशल्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
तपस्या नेवे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे यांच्या ‘जाऊ मी सिनेमात’ या पुस्तकातील निवडक भागाचे प्रभावी अभिवाचन केले. १९४० साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत त्यांच्या कन्या नयना आपटे यांनी लिहिलेल्या आठवणींचाही समावेश आहे. त्या माध्यमातून शांता आपटे यांच्या संघर्षमय जीवनाचे चित्रण जिवंत झाले. त्यानंतर त्यांनी अशोक बागवे यांच्या ‘आजतागायत’ या पुस्तकातील ‘बाळा शब्दांची शेती कर’ हा ललितबंध सादर करीत श्रोत्यांना बालपणाच्या आठवणींमध्ये नेले.
यानंतर डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांनी ‘योगेश्वरी’ या पुस्तकातील निवडक भागांचे अभिवाचन केले. श्रीकृष्णाशी संवादाच्या माध्यमातून आध्यात्मिक विचार मांडणाऱ्या या वाचनात भक्ती, नामस्मरण आणि आत्मविश्वासाचा संदेश दिला गेला. त्यांच्या गोड आवाजातील सादरीकरण आणि स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या गायनाने वातावरण भक्तिमय झाले. या कार्यक्रमाला संस्थापक जितेंद्र वैद्य, विवेक करमरकर, प्रदीप केळकर, नरेंद्र फडके, अनंत गद्रे, भाग्यश्री कासार, आसावरी जोशी, स्नेहल फडके, उज्ज्वला कोळी, रश्मी जोशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com