

बेलापूर, ता. २६ (बातमीदार) : सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा ३४ अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असताना नवी मुंबई शहरात याच प्रखर उष्णतेत, पाण्याची पातळी कमी झालेल्या टी. एस. चाणक्य, ठाणे खाडी परिसरात पेंटेड स्टॉर्क म्हणजेच चित्रबलाक पक्ष्याने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिवसभर दमट, उष्ण हवामान असले तरी रंगीत करकोच्याच्या नवी मुंबईतील आगमनाने पक्षीप्रेमींमध्ये काहीसा उत्साह दिसून येत आहे.
चित्रबलाक पक्षी हा आशिया खंडातील निवासी पक्षी असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये आढळतो. तळी, दलदलीच्या जागा आणि भातशेती अशा ठिकाणी या पक्ष्यांचा वावर असतो. दरम्यान, चित्रबलाक पक्षाचे थवेच्या थवे सध्या अन्नाच्या शोधात नवी मुंबईतील टी. एस. चाणक्य, ठाणे खाडी, डीपीएस याठिकाणी आल्याने परिसर पक्ष्यांनी फुलला आहे. हा परिसर पक्षीप्रेमींना आकर्षित करत आहे. चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची असते. टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा असतो. त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात. सध्या शहरात पक्षीप्रेमी, अभ्यासकांकडून या पक्ष्यांचा हालचाली टिपण्यासाठी गर्दी करत आहेत.
मासे खाण्यासाठी पाणथळ जागी
बगळा, रोहित पक्षी, करकोचा, आयबीस असे सर्व परिचित असणारा पक्ष्यांच्या कुळातील चित्रबलाक हा पक्षी आहे. पाणथळ जागांवर पाण्याची पातळी कमी झाल्यावर मोठ्या संख्येने हे पक्षी मासे खाण्यासाठी येत असतात. दरवर्षी मार्च ते मे या काळात हे पक्षी भारतातील विविध ठिकाणी पाहायला मिळतात.
सध्या हे पक्षी नवी मुंबईत मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कमी झालेल्या पाण्याच्या पातळीत मासेमारी करणे, हे या पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या शरीरावरील रंगछटा विशेष आकर्षित करतात.
- विद्यासागर हरिहरन, पक्षी अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.