

अफवेने इंधन टंचाईचे सावट
पेट्रोल पंपांवर चालकांची झुंबड; शहरभर रांगा
ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार) ः अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय इंधन पुरवठ्याला बसणार, या एका निराधार अफवेने गुरुवारी (ता. २६) ठाणे शहरात प्रचंड खळबळ उडाली. सोशल मीडिया आणि काही माध्यमांतील चुकीच्या बातम्यांमुळे शहरातील पेट्रोल-डिझेलचा साठा संपणार, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली. परिणामी, हातातील कामे सोडून वाहनधारकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गुरुवारी सकाळपासूनच ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसर, कापूरबावडी, मखमली तलाव आणि नौपाडा भागातील पंपांवर वाहनांची गर्दी वाढू लागली. एका वृत्तवाहिनीने ठाण्यातील पुरवठा खंडित झाल्याची बातमी चालवल्याने आगीत तेल ओतले गेले. ‘पुढील काही दिवस पेट्रोल मिळणार नाही,’ या भीतीने दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनधारकांनी इंधनाच्या टाक्या ‘फुल’ करून घेण्यावर भर दिला. यामुळे अनेक पंपांवर इंधन भरण्यासाठी दोन ते तीन तास ताटकळत उभे राहावे लागले, ज्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवर होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
लोकमान्यनगरचे रहिवासी सागर येडे यांनी सांगितले, की पेट्रोल संपणार असल्याची बातमी ऐकल्याने तातडीने कापूरबावडी गाठली. तिथे इंधन उपलब्ध होते; पण खबरदारी म्हणून टाकी पूर्ण भरून घेतली. मखमली तलाव येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या मते, इंधनाचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू असला तरी, नागरिक आज गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. तीन पेट्रोल पंप परिसरात दोन पंप जवळजवळ असल्याने तिथे रांगा थेट रस्त्यापर्यंत आल्या होत्या.
इंधन पुरवठा सुरळीत
दरम्यान, इंधन कंपन्यांच्या अधिकृत सूत्रांनी आणि प्रशासनाने ठाणे शहरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा पुरवठा मुबलक असल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा स्थानिक पुरवठ्यावर कोणताही तत्काळ परिणाम झालेला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.