

धरणासाठी रस्ताच खोदला; ग्रामस्थांची वहिवाट बंद
जलसंधारण विभागाच्या निष्काळजीपणामुळे संताप; ‘जलसमाधी’ आंदोलनाचा इशारा
ठाणे, ता. २६ : खेड तालुक्यातील शिवतर गावात उभारण्यात आलेल्या ‘शिवतर कोडबा’ धरणाच्या कामादरम्यान झालेल्या चुकीच्या उत्खननामुळे शिवतर-नामदरेवाडी हा एकमेव रस्ता धोकादायक बनला असून काही ठिकाणी खचल्याने ग्रामस्थांची वहिवाट बंद झाली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील शिवतर येथे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या पाठीमागे सुमारे ७० ते ७५ घरांची नामदरेवाडी वस्ती आहे. या वाडीला जोडणारा २.१७५ किलोमीटर लांबीचा शिवतर-दत्तवाडी ते नामदरेवाडी रस्ता हा एकमेव संपर्क मार्ग आहे. धरणाचे काम करताना रस्त्याच्या खालच्या बाजूने चुकीच्या पद्धतीने माती काढण्यात आल्याने १४ जुलै २०२४ रोजी रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर मे २०२५ मध्ये तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली; मात्र त्यानंतरही पुन्हा उत्खनन सुरूच ठेवण्यात आल्याने जून २०२५ मध्ये दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचला. या धरणाच्या मागिल बाजूस ७० ते ७५ घरांची लोकवस्ती असून नामदरेवाडीला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या भागात मुसळधार पावसामुळे डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने पुढील काही वर्षांत ७०० ते ८०० फूट रस्ता टप्प्याटप्प्याने वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तरीही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
----------
आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका
घनदाट वनराईमुळे सर्पदंश किंवा वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेणे कठीण होणार आहे. विशेषतः गर्भवती महिलांना वाहतूक उपलब्ध न झाल्यास डोलीचा आधार घ्यावा लागू शकतो. अशा परिस्थितीत काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुनील मोरे यांनी दिला आहे. या संदर्भात संबंधितांनी मृद व जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. रस्त्याच्या खालच्या बाजूस संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘जलसमाधी’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच जलसंपदा मंत्री संजय राठोड यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.