

बॅँकेचा सुरक्षा व्यवस्थापक
निघाला सायबर ठग
६५ लाखांची फसवणूक; दाेघांना अटक
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : ऑनलाइन जुगाराच्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीची तब्बल ६५ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीतील दाेघांना सायबर पोलिसांनी जोगेश्वरीतून अटक केली आहे. यातील एक आराेपी हा बड्या खासगी बॅँकेचा सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे धागेदाेरे थेट दुबईपर्यंत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट आले आहे.
फसवणूक झालेला ३० वर्षीय व्यावसायिक काेपरखैरणे येथे राहत आहे. २०२३मध्ये त्याने ‘सॅट स्पोर्ट्स’ ही एक नामांकित लिस्टेड कंपनी असल्याचे समजून तिच्या पोर्टलवर नाेंदणी केली होती. आराेपींनी सॅट स्पोर्ट्सच्या माध्यमातून तीनपत्ती आणि कॅसिनोसारख्या गेम्समधील गुंतवणुकीतून माेठ्या नफ्याचे प्रलाेभन दाखवले. सुरुवातीला काही रक्कमही दिली, त्यामुळे विश्वास बसल्यामुळे तक्रारदाराने मोठ्या प्रमाणात गेम खेळण्यास सुरुवात केली. पाेर्टलवर नफा दिसत असल्यामुळे या व्यावसायिकाने गत तीन वर्षांत तब्बल ६५ लाख १६ हजार ५०० रुपये या गेमिंगमध्ये गुंतवले. त्याचा नफा एक कोटी २५ लाख रुपये दाखवत हाेते; मात्र ही रक्कम काढता येत नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळी आणि त्यांच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. त्यानुसार पोलिसांनी जोगेश्वरीतील बेहराम बाग येथून आरोपी विशाल रामरतन जयस्वाल (वय २६) याला ताब्यात घेतले. चौकशीत तो एका खासगी बँकेत सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचा साथीदार आवेश धर्मेंद्र वर्मन (२६) याला अटक करण्यात आली.
-----
दुबईतून काढले पैसे
- सायबर पाेलिसांनी दाेन्ही आराेपींकडून ८६ बॅँक खात्यांची सामग्री, ६४ एटीएम कार्ड, १५ सिम कार्ड, तीन माेबाईल, एक लॅपटाॅप आणि पीओएस मशीन इत्यादी साहित्य हस्तगत केले आहेत.
- आरोपी भारतातून सिम कार्ड खरेदी करून ते ॲक्टिव्ह करत होते. हे सिम कार्ड दुबईत बसलेल्या त्यांच्या साथीदारांना पाठवले जात होते. तेथे फसवणुकीची रक्कम काढली जात हाेती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.