

भिवंडी पोलिसांकडून
तीन कोटींचा मुद्देमाल जप्त
भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) ः भिवंडीतील गोदामपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत. भिवंडी तालुका पोलिसांकडून एका घरफोडीच्या तपासादरम्यान अटक केलेल्या सहा जणांच्या टोळीकडून एका गुन्ह्याचा शोध घेत, चोरी केलेला तब्बल तीन कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान वडपे हद्दीतील एका गोदामात घरफोडी करत कॅमेरा आणि कॅमेऱ्याचा तब्बल तीन कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणात भिवंडी तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची दखल घेत ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींना अटक केली.
किरण मनोहर टोले (२९), प्रमोद मनोहर टोल, गिरीष अशोक अधिकारी, राहुल भगवान दिवेकर (२८), आशीष मधुकर पाटील (३३), शब्बीर अली मोहंमद युसूफ शेख (३४) या सात जणांच्या टोळीचा तपास लागला. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले ११८ कॅनॉन कंपनीचे कॅमेरे, १०६ कॅनॉन कंपनीच्या लेन्स, २ एम.व्ही.आर. तसेच गुन्हा करताना वापरलेल्या दोन चारचाकी व एक दुचाकी असा एकूण तीन कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत त्यांच्याकडे इतर चोरीच्या गुन्ह्यांचा अधिक तपास करीत असताना भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात एका चोरीच्या गुन्ह्याची उकल केली. ज्यात याच टोळीतील काहींनी एका गोदामात हार्डडिक्स व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये तिघांकडून ५२ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.