डोंबिवलीत शिक्षिकेला अश्लील मेसेज ट्रस्टीचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, परिसरात संताप

डोंबिवलीत शिक्षिकेला अश्लील मेसेज 
ट्रस्टीचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, परिसरात संताप
Published on

शिक्षिकेवर शरीरसंबंधासाठी दबाव
शाळेच्या विश्वस्तांचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : डोंबिवलीमधील सागाव परिसरातील एका शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या विश्वस्तांच्या मुलाने शिक्षिकेला अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून शरीरसंबंधासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका शाळेच्या विश्वस्तांच्या मुलाने शाळेतील एका शिक्षिकेला वारंवार अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती. केवळ मेसेजच नव्हे, तर त्याने अश्लील व्हिडिओ पाठवून शिक्षिकेकडे शरीरसंबंधाची मागणी केल्याचा आरोप पीडित शिक्षिकेने केला आहे. सततच्या या छळाला कंटाळून संबंधित शिक्षिकेने आपल्या आईसह गुरुवारी (ता. २६) सकाळी मनसे पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली. सुमारे एक तास शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिसांनी विश्वस्तांकडे त्यांच्या मुलाबाबत चौकशी केली. पोलिसांनी मुलाला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असून, सध्या पीडित शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाळेच्या विश्वस्तांनी प्रतिक्रिया देताना, माझ्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्याला कडक शिक्षा व्हावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com