नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता देशांतर्गत उड्डाणांचा विस्तार; ४६ शहरांशी जोडले जाणार नाते

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता देशांतर्गत उड्डाणांचा विस्तार; ४६ शहरांशी जोडले जाणार नाते
Published on

नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणांचा विस्तार
आठवड्याला १,०९२ विमानांची ये-जा, प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपले पहिले ‘उन्हाळी वेळापत्रक’ जाहीर केले आहे. याद्वारे विमानतळाच्या देशांतर्गत जाळ्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला आहे. रविवारपासून (ता. २९) लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकानुसार, हे विमानतळ देशातील एकूण ४६ शहरांशी थेट जोडले जाणार आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये या विमानतळाचे व्यावसायिक कामकाज सुरू झाल्यापासून, नवी मुंबई विमानतळाने अत्यंत कमी वेळात आपली क्षमता वाढवली आहे. या नवीन उन्हाळी वेळापत्रकामुळे ३० नवीन मार्ग उपलब्ध होणार असून, व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वेळापत्रकामुळे साप्ताहिक विमानांच्या फेऱ्यांमध्ये १,०९२ पर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे दररोज सरासरी १५६ विमानांची ये-जा या विमानतळावरून होईल. एप्रिल २०२६ पर्यंत दैनंदिन उड्डाणांची संख्या २२ वरून ७८ पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या तीन प्रमुख कंपन्या आपली सेवा विस्तारणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या या विस्तारामुळे मुंबईवरील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भार हलका होण्यास मदत होईल. तसेच टियर-१ आणि टियर-२ शहरांशी थेट संपर्क वाढल्यामुळे व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
---------------
प्रमुख शहरे आणि धार्मिक स्थळे केंद्रस्थानी
या विस्तारामध्ये दिल्ली (९ दैनंदिन उड्डाणे), गोवा (७ उड्डाणे), बेंगळुरू (६ उड्डाणे) आणि कोचीन (५ उड्डाणे) यांचा सर्वाधिक वाटा असेल. याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदूर यांसारख्या शहरांसाठीही पुरेशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अयोध्येसारख्या धार्मिक आणि आग्रा, श्रीनगर, दीव यांसारख्या पर्यटन स्थळांचाही या ३० नवीन शहरांच्या यादीत समावेश आहे.
-------------
उन्हाळी वेळापत्रकात ३० नवीन शहरांचा समावेश
आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दीव, दुर्गापूर, गोवा (दाबोलिम), गोरखपूर, हिंडन, हिरासर (राजकोट), हुबळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पाटणा, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, त्रिवेंद्रम आणि विशाखापट्टणम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com