

मिरा रोड येथील महिलेचा चाकूने खून
भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : मिरा रोड येथे एका महिलेचा चाकूने खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. २५) रात्री घडली. याप्रकरणी संशयित आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
काशी मिरा येथे राहणारी महिला सिल्व्हर पार्क परिसरातील इमारतीत घरकाम करण्यासाठी जात होती. महिला नेहमीप्रमाणे बुधवारी (ता. २५) सायंकाळी ७च्या सुमारास घरकाम करण्यासाठी गेली; मात्र एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या पाठोपाठ घरात शिरत तिच्यावर हल्ला केला. त्या व्यक्तीने महिलेवर धारधार हत्याराने पोट, छाती आणि मानेवर वार करून तेथून पळ काढला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
महिला ज्या घरात घरकाम करीत होती त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीकडून त्यांना शारीरिक संबंधासाठी वारंवार त्रास देण्यात येत होता. मात्र महिलेने त्याला नकार दिला. ही गोष्ट महिलेच्या मुलाला समजताच त्याने त्या व्यक्तीला जाब विचारत मारहाण केली होती. त्याचा राग मनात ठेवत शारीरिक संबंधासाठी त्रास देणाऱ्या व्यक्तीने हा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.