

बेस्ट कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख द्या
न्यायालयाचे भरपाईचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : कोरोनामध्ये कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई आणि वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाला (बेस्ट) दिले.
कोरोना काळात कर्तव्य बजावताना नयन लोकेश्री यांचा मृत्यू झाला. बेस्ट प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतेही लाभ दिले नाहीत. त्यामुळे लोकेश्रींचा मुलगा सुबोधने वकील विवेक ठाकरे आणि सूरज चकोरमार्फत उच्च न्यायालयात याचिका केली होती. सानुग्रह अनुदान आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रमुख मागणी याचिकेत केली होती. त्या याचिकेची गंभीर दखल न्या. रियाज छागला आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने घेतली. कोरोनाची लक्षणे, सहव्याधी आणि रुग्णालयातील उपचाराच्या नोंदी पाहता लोकेश्रींचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे स्पष्ट असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. याचिकाकर्त्यांना ५० लाख रुपयांची भरपाई नाकारण्याचा आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी न देण्याचा बेस्ट प्रशासनाचा आदेश रद्द केला. तसेच दोन्ही आदेशांची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्यापासून ६० दिवसांत करावी, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.