एक्सप्रेसमध्येही थांबे जाहीर करणाऱ्या उद्घोषणा सुरू करा

एक्सप्रेसमध्येही थांबे जाहीर करणाऱ्या उद्घोषणा सुरू करा
Published on

‘वंदे भारत’प्रमाणे एक्स्प्रेसमध्येही
थांब्यांबाबत उद्‍घोषणा सुरू करा!
उच्च न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : वंदे भारतप्रमाणे सर्व लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्येही प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी थांबे जाहीर करणारी उद्‍घोषणा प्रणाली सुरू करा, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच चालत्या गाडीतून चढण्याचा वा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असा सावधगिरीचा इशाराही न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने प्रवाशांना दिला.

जवळपास १० वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या याचिकाकर्त्याला ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. स्थानिक उपनगरीय गाड्यांमध्ये (लोकल) पुढील स्थानकाबाबत फलकावर व उद्‍घोषणेद्वारे माहिती दिली जाते; मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये फलाटांवर अशा प्रकारचे फलक किंवा उद्‍घोषणा होत नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वापर प्रवासी एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकापर्यंतचे कमी अंतराचा प्रवास करण्यासाठीही करतात. परंतु गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार नाही, याविषयी घोषणा केली जात नसल्यास त्या स्थानकावरून गाडीत चढ वा उतार करणाऱ्या प्रवाशाला दोषी धरता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. गाडी कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार आहे, याबाबत स्पष्ट उल्लेख असलेली उद्‍घोषणा ‘वंदे भारत’मध्ये केली जाते. त्या धर्तीवर लांब पल्ल्याच्या अन्य गाड्यांमध्येही अशा उद्‍घाषणा प्रणालीची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केली.
----
प्राधिकरणाचा निष्कर्ष फेटाळला
रोहिल कुमावत हे गुवाहाटी एक्स्प्रेसने मनमाडहून जळगावला जात होते. गाडी जळगाव स्थानकात पोहोचताना गर्दीमुळे त्यांचा हात निसटला आणि ते गाडीतून खाली पडले. त्याबाबत जानेवारी २०१८मध्ये रेल्वे दावा न्यायाधिकरणाने कुमावत यांचा नुकसानभरपाईचा दावा फेटाळला. कुमावत हे दरवाजाजवळ बसले होते. गाडी जळगावला थांबणार नसल्याचे लक्षात आल्यावर गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच ते खाली पडले, असेही न्यायाधिकरणाने नमूद केले होते.  उच्च न्यायालयाने मात्र न्यायाधिकरणाचा हा निष्कर्ष फेटाळला.
---
कृत्य जाणीवपूर्वक नाही!
कुमावत हे वैध तिकिटावर प्रवास करीत होते. त्याचप्रमाणे जळगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने सर्व गाड्या तिथे थांबतात, हे गृहीत धरूनच ते गाडीत चढले होते. तथापि, गाडी जळगावला थांबली नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट करून कुमावत यांना दिलासा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com