

महाराष्ट्रात तात्पुरते केरोसिन वाटप सुरू
एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबई, ता. २६ : राज्यात एलपीजी गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरणाचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने १२ मार्च २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्राला एकूण ३,७४४ किलोलिटर (३७.४४ लाख लिटर) केरोसिनचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान उज्ज्वला योजनेसह विविध योजनांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस जोडणी झाली होते. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, गॅस जोडणीधारकांना केरोसिन वितरण मर्यादित करण्यात आले होते; मात्र सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.
...
प्रतिकुटुंब तीन लिटर
शासन आदेशानुसार, प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला तीन लिटर केरोसिन देण्यात येणार आहे. विशेषतः अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेली कुटुंबे तसेच स्थलांतरित मजूर यांनाही लाभ दिला जाईल.
...
वितरण कालावधी निश्चित
मार्च २०२६पासून केरोसिन वितरण सुरू करण्यात येणार असून, वाटप झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत संपूर्ण उचल पूर्ण करणे बंधनकारक आहे. न उचललेला साठा पुढे हस्तांतरित केला जाणार नाही.
...
तेल कंपन्यांना निर्देश
तेल कंपन्यांना जिल्हानिहाय वाटप काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूण साठ्यापैकी ८५ टक्के केरोसिन पहिल्या पंधरवड्यात आणि उर्वरित साठा दुसऱ्या पंधरवड्यात वितरित करण्याचे नियोजन आहे.
--
वितरण साखळीची आखणी
सरकारी तेल कंपन्यांच्या वितरकांमार्फत केरोसिन उचलून ते जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रास्त भाव दुकाने व परवानाधारक विक्रेत्यांपर्यंत पोहोचवले जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब तीन लिटरप्रमाणे वितरण होईल. ज्या गावांत विक्रेते उपलब्ध नाहीत, तेथे नजीकच्या गावातून केरोसिन पुरवठा केला जाणार आहे.
--
प्रशासनाची जबाबदारी वाढली
जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाला वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, केरोसिनच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निरीक्षण पथके स्थापन केली जाणार आहेत. राज्य शासनाने स्पष्ट केले आहे, की हे केरोसिन वाटप तात्पुरत्या स्वरूपाचे असून, परिस्थितीनुसार त्यात बदल करण्यात येऊ शकतो.
--
दुकानदारांपुढे मोठा प्रश्न
२०१६-१७ दरम्यान राज्यातील सर्वच रेशनिंग दुकानांवरील केरोसिनचा पुरवठा बंद करण्यात आल्यानंतर त्यासाठीच्या टाक्या, वजनमापे ही दुकानदारांकडून बाद करण्यात आली; मात्र आता शासनाने पुन्हा केरोसिन रेशनिंग दुकानावरून विकण्यासाठी आदेश जारी केल्याने आता या तेल साठवण्यासाठीच्या टाक्या आणायच्या कुठून व त्यासाठीच्या विविध परवानग्या कधी घ्यायच्या, असा प्रश्न दुकानदारांपुढे पडला आहे.
--
एकीकडे टाक्या उपलब्ध नाहीत आणि दुसरीकडे महापालिकेकडून रॉकेल विकण्यासाठी लायसन्स लागते ते कधी घेणार, असा प्रश्नही दुकानदारांपुढे पडला आहे. यासोबतच जे माप असते त्या मापांना वैद्यमापन विभागाकडून रिन्यू करून घेणे आवश्यक असते तेदेखील दुकानदारांनी न केल्याने तोही प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.