मराठी शाळा इंग्रजी माध्यमात रूपांतराच्या प्रस्तावाला मनसेचा विरोध

मराठी शाळा इंग्रजी माध्यमात रूपांतराच्या प्रस्तावाला मनसेचा विरोध
Published on

इंग्रजी शिक्षण धोरणाला मनसेचा विरोध
आर्थिक भ्रष्टाचारासाठी प्रस्ताव आणल्याचा काळे यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : नवी मुंबई महापालिकेच्या सर्व मराठी शाळा इंग्रजी करण्यास मनसेने विरोध दर्शविला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. इंग्रजी शाळांच्या नावाखाली खासगी संस्थांमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी हा घाट घातला जात असल्याचा आरोपही काळे यांनी या वेळी केला.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घ्यायला पाहिजे. सरकारचे धोरण मातृभाषेतून शिक्षण देणे, असे असताना सत्ताधारी भाजप नेत्यांनी मनपा सभागृहात अभ्यास न करता अशासकीय प्रस्ताव मांडला. नवी मुंबईत पालिकेच्या मराठी माध्यमांच्या अनेक शाळा अशा आहेत ज्यांची पटसंख्या हजारोंच्या संख्येने आहे. जर सत्ताधाऱ्यांचा अट्टहास हा इंग्रजी माध्यम शाळा करण्याचा असेल तर ज्या पालिका शाळांची पटसंख्या अत्यंत कमी आहे अशा शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची सूचना गजानन काळे यांनी केली. मुळात मनसेचा विरोध हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नसून, हा सरसकट सर्व मराठी शाळांना इंग्रजी माध्यमाच्या करण्याला आहे. सत्ताधारी भाजपला गरीब मुलांना इंग्रजी शिकवायचे नाही तर सर्व शाळा खासगी करून मलई खायची आहे, असा आरोपही गजानन काळे यांनी केला.
सीवूड्समधील पालिकेच्या सीबीएसई शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या पगाराची ५५ टक्के रक्कम पालिका देईल, असा करार खासगी संस्था आकांक्षा फाउंडेशनसोबत झाला. तर कोपरखैरणेमधील सीबीएसई शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या पगाराची १०० टक्के रक्कम पालिका देईल, असा करार खासगी संस्था पीएम श्री संस्थेसोबत झाला आहे. अशाच पद्धतीने सर्व शाळा आपल्या कार्यकर्त्यांच्या खासगी संस्थांना आर्थिक लाभासाठी देण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या सुरू करण्यासाठी शिक्षक भरतीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच जवळपास ६०० मराठी शिक्षकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल, त्याबाबत कोणतेही धोरण नसल्याचे गजानन काळे यांनी निदर्शनास आणून दिले. गरिबांना इंग्रजी माध्यमात शिक्षण द्यायचे आहे, अशी दवंडी पिटणाऱ्या नेत्यांनी पालिकेच्या सर्व शाळांमध्ये अजून फायर ऑडिट झाले नसून, अग्नी सुरक्षेची कोणतीही साधने उपलब्ध नाहीत, अशी माहिती ही माहिती अधिकारात मिळाली आहे. मग आमच्या मुलांना अग्नितांडवात तुम्ही झोकून देणार आहात का, असा सवालही गजानन काळे यांनी उपस्थित केला. मनसेच्या या पत्रकार परिषदेत मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसे नगरसेवक अभिजित देसाई, मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com