

प्रखर उन्हात ठाणे ‘कागदी फुलां’नी बहरले
प्रदूषणाशी लढा देत शहराच्या सौंदर्यात पडली भर
राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. २८ ः वाढते प्रदूषण आणि रखरखत्या उन्हाच्या झळांनी ठाणेकर त्रस्त असतानाच शहराच्या रस्त्यांवर एक सुखद आणि विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे. ठाण्यातील मुख्य महामार्गांपासून ते अंतर्गत गल्लीबोळांपर्यंत विविध रंगांची ‘कागदी फुले’ (बोगनव्हिलिया ग्लॅब्रा) पूर्ण बहरात आली आहेत. प्रखर उन्हातही ही फुले अत्यंत टवटवीत दिसत असल्याने, जणू संपूर्ण शहराला फुलांच्या माळा घातल्याचा भास होत आहे.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक, मुंबई-गुजरात आणि मुंबई-आग्रा यांसारखे महत्त्वाचे महामार्ग जातात. प्रचंड वाहतुकीमुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १७७ पर्यंत पोहोचला असून तापमान ३८ ते ४० अंशांच्या घरात आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा कार्बन डाय-ऑक्साइड आणि धूलिकण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने पुलांखाली, रस्ते दुभाजकांमध्ये आणि मेट्रो मार्गाच्या खाली या फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. ही झाडे केवळ सौंदर्यच वाढवत नाहीत, तर हवेतील विषारी घटक शोषून प्रदूषण कमी करण्यासही मदत करत आहेत.
प्रमुख मार्गांवर फुलांचा गालिचा
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रूप आता पालटले आहे. लालबहादूर शास्त्री मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-गुजरात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाल, गुलाबी आणि पांढऱ्या फुलांचा गालिचा पाहायला मिळत आहे. विशेषतः नितीन कंपनी ते माजिवडा या तीन किमी लांबीच्या उड्डाणपुलावर फुलांचा मोठा बहर आला आहे. तसेच कॅडबरी नाका ते शास्त्रीनगर नाका, पोखरण रोड एक व दोन आणि कळवा ते रेतीबंदर रस्ता या फुलांमुळे अधिकच देखणे झाले आहेत.
कमी पाणी अन् उन्हातही टवटवीत
‘बोगनव्हिलिया’ या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे हे झाड प्रखर उन्हात अधिक बहरते आणि याला पाण्याची गरज कमी असते. महापालिकेतर्फे या झाडांना एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प), बोअरवेल आणि विहिरींचे पाणी टँकरद्वारे घातले जाते. वेळेवर खतपाणी आणि योग्य निगा राखल्यामुळे ही झाडे भर उन्हाळ्यातही ताजीतवानी दिसत आहेत.
या मार्गांवर हिरवाई
मुख्य महामार्ग : लालबहादूर शास्त्री मार्ग, मुंबई-नाशिक आणि मुंबई-गुजरात महामार्गावर प्रवाशांना या फुलांचा गालिचा पाहायला मिळत आहे.
अंतर्गत रस्ते : कॅडबरी नाका ते शास्त्रीनगर नाका (दोन किमी), पोखरण रोड एक व दोन आणि कळवा ते रेतीबंदर रस्ता या फुलांनी उजळून निघाला आहे.
उड्डाणपूल : नितीन कंपनी ते माजिवडा या तीन किमी लांबीच्या उड्डाणपुलावर फुलांचा बहर पाहून वाहनचालकांमध्ये प्रसन्नता पसरत आहे.
ठाणे शहरातील झाडांचे प्रमाण वाढल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. कागदी फुलांच्या झाडांमुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून, आम्ही टँकरद्वारे पाणी आणि खते देऊन त्यांची नियमित निगा राखत आहोत.
- केदार पाटील, वृक्ष प्राधिकरण अधिकारी, ठाणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.