मोहन पाम मार्ग परिसरात बेवारस वाहनांचा साठा

मोहन पाम मार्ग परिसरात बेवारस वाहनांचा साठा
Published on

मोहन पाम मार्गावर बेवारस वाहनांचा खच
बदलापुरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : शहरातील मोहन पाम मार्ग परिसरात अनधिकृत गॅरेजवर झालेल्या कारवाईनंतर आता बेवारस वाहनांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याकडेला वर्षानुवर्षे उभी असलेली ही जुनी आणि धूळ खात पडलेली वाहने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करीत आहेत. याप्रकरणी ॲड. सौरभ सुदर्शन राव यांनी वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार करीत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

गॅरेज हटले पण कचरा कायम आहे. काही दिवसांपूर्वी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने या परिसरातील अनधिकृत गॅरेजवर धडक कारवाई केली. दरम्यान, गॅरेजमालकांनी आपली भंगार वाहने रस्त्यावरच सोडून दिली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक वाहनांवर पुणे, कर्नाटक तसेच इतर राज्यांच्या नंबर प्लेट आहेत. ही वाहने नेमकी कोणाची आहेत आणि ती येथे का सोडली आहेत, याबाबत परिसरात संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.

गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याची भीती

रस्त्यावर विखुरलेल्या या बेवारस वाहनांमुळे केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही, तर रात्रीच्या वेळी या ठिकाणी असामाजिक कृत्ये घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही वाहने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांसाठी लपण्याचे ठिकाण किंवा अमली पदार्थांच्या सेवनासाठी केंद्र बनू शकतात, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. कोणत्याही क्षणी या वाहनांचा गैरवापर होऊ शकतो, या भीतीने रहिवासी त्रस्त आहेत.

आंदोलनाचा इशारा
कायदेशीर कारवाईची मागणी ॲड. सौरभ राव यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाचे लक्ष वेधताना, महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ (कलम ८२) आणि मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ (कलम १२७) नुसार या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या समस्येची दखल घेण्यासाठी तक्रारीची वाट का पाहिली, असा सवालही आता नागरिक उपस्थित करीत आहेत. वाहतूक विभागाने ही वाहने तातडीने टोइंग करून परिसर मोकळा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. आता पोलिस आणि नगरपालिका प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com