

विठ्ठलवाडीत मध्यरात्री माथेफिरूचा धुमाकूळ
दुचाकींची तोडफोड, थरार सीसीटीव्हीत कैद
कल्याण, ता. २८ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री एका तरुणाने रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या माथेफिरूने केलेल्या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी परिसरात रात्रीच्या शांततेचा फायदा घेत आरोपीने रस्त्याकडेला रांगेत उभ्या असलेल्या दुचाकींना लक्ष्य केले. हातात मोठा दगड घेऊन त्याने एकामागून एक गाड्यांच्या पुढील काचा, मीटर आणि हेडलाइट्स फोडून मोठे नुकसान केले. मध्यरात्री झालेल्या या आवाजामुळे काही नागरिक घराबाहेर आले, तेव्हा त्यांना आपल्या गाड्यांची मोडतोड झाल्याचे दिसून आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.
परिसरातील रहिवाशांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या फुटेजमध्ये एक तरुण हातात दगड घेऊन गाड्यांवर प्रहार करताना स्पष्टपणे दिसून आला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी बादल चव्हाण (२३) याच्यावर मालमत्तेचे नुकसान आणि तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तपास सुरू
आरोपीने हे कृत्य नेमक्या कोणत्या कारणातून केले, तो नशेत होता की त्याचा कोणाशी वैयक्तिक वाद होता याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोळसेवाडी पोलिसांनी दिला आहे. अशा घटनांमुळे रात्रीच्या वेळी वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.