शिवसेना नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट

शिवसेना नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
Published on

प्रभाग क्र. ५ मधील पाणीटंचाईचा प्रश्न पेटला
शिवसेना नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
कल्याण. ता. २८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जाणवणाऱ्या भीषण पाणीटंचाईबाबत शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना शहरप्रमुख रवि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या समस्यांचे निवेदन सादर केले तसेच हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

कल्याण पश्चिमेतील प्रभाग ५ मधील मोहन पॅराडाईज फेज-२ आणि वायलेनगर परिसरातील रहिवाशांना मागील अनेक दिवसांपासून विस्कळित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येबाबत सोसायटीचे सचिव सुरेश आंबेकर यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यकारी विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. स्थानिक स्तरावर तोडगा निघत नसल्याने अखेर रहिवाशांनी नगरसेवकांकडे धाव घेतली. या पार्श्वभूमीवर नगरसेवक किरण भांगले, रुपेश सकपाळ, प्रमिला पाटील आणि डॉ. तनुजा वायले यांच्या वतीने अनिकेत वायले यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने चौकशी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

मूलभूत सुविधांसाठी कटिबद्ध
नागरिकांना पाणी आणि इतर नागरी सुविधा वेळेत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जोपर्यंत मोहन पॅराडाइज आणि वायलेनगरचा पाणीप्रश्न पूर्णतः सुटत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास शिवसेना लोकप्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com