गोवेली रोडवरील पेट्रोल पंप बंद

गोवेली रोडवरील पेट्रोल पंप बंद
Published on

गोवेली रोडवरील एकमेव पेट्रोल पंप बंद
३० गावांतील वाहनचालकांचे प्रचंड हाल
टिटवाळा, ता. २८ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील टिटवाळा-गोवेली रोडवरील मुख्य पेट्रोल पंप अचानक बंद पडल्याने संपूर्ण परिसरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या एकाच पंपावर टिटवाळा शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ३० गावे अवलंबून असल्याने दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोवेली रोडवरील हा पेट्रोल पंप टिटवाळा परिसरातील दळणवळणाचा केंद्रबिंदू मानला जातो. हा पंप बंद झाल्याने दूधविक्रेते, भाजीपाला वाहतूकदार, रिक्षाचालक आणि कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे नियोजन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. इंधनासाठी नागरिकांना आता १० ते १५ किलोमीटर लांब असलेल्या शहाड, बापसाई किंवा म्हारळ येथील पंपावर धाव घ्यावी लागत आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अतिरिक्त फटका बसत असून, लांबच्या पंपांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पेट्रोल पंपचालकाची कंपनीकडील थकबाकी वाढल्याने क्रेडिट व्यवहार थांबवण्यात आले आहेत. परिणामी कंपनीकडून इंधनाचा पुरवठा रोखण्यात आल्याची चर्चा आहे; मात्र पंप प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. केवळ नो स्टॉक असे फलक पाहून वाहनचालकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. आगामी काळात उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना इंधनासाठी वणवण करावी लागल्यास नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन किंवा संबंधित तेल कंपन्या यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांची कोंडी
टिटवाळा स्टेशनवरून ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. इंधन भरण्यासाठी लांब जावे लागत असल्याने अनेक रिक्षाचालकांनी व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले आहे, ज्याचा परिणाम शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांवर होत आहे. दुसरीकडे शेतीच्या कामांसाठी डिझेलची आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे.

प्रशासनाच्या हस्तक्षेपाची मागणी
टिटवाळा वेगाने विस्तारत आहे. अशा वेळी परिसरातील एकमेव मोठा पंप बंद राहणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात मध्यस्थी करून इंधन पुरवठा सुरळीत करावा अन्यथा ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल, अशी मागणी स्थानिक नागरिक संतोष विशे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com