

भूसंपादन मोबदला वाटप सुरू
आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पालघर, ता. २८ (बातमीदार) : वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भूधारकांना मोबदला सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक कार्यपद्धती आखली असून, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दरम्यान, हा भूसंपादन मोबदला थेट प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात जाणार असल्याने आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक संचित मंगला, विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच पालघर व डहाणू तालुक्यातील अधिकारी, सक्षम प्राधिकारी (सीएएलए), बँकांचे अधिकारी, प्रकल्प क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. हा मोबदला थेट संबंधित भूधारकांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले. भूधारकांना अद्ययावत ७/१२ उतारा, फेरफार नोंदी सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या प्रकरणांमध्ये वारस नोंदी प्रलंबित आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी तलाठी कार्यालये व ग्रामपंचायती येथे विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले.
--------------
बँकांनाही सूचना
याशिवाय बँकांनी भूधारकांना नियमित उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा ठेवून कुटुंबीयांची संमती घेण्याची प्रणाली विकसित करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले. मोबदल्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा धोका लक्षात घेता, ओटीपी किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बँका व पोलिस विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवण्याचेही निर्देश या वेळी देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.