

सानपाड्यात अत्याधुनिक सेंट्रल लायब्ररी
आ. मंदा म्हात्रे यांची संकल्पना
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : सानपाडा परिसरात लवकरच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी सेंट्रल लायब्ररी उभी राहणार आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही लायब्ररी उभी राहणार आहे. या प्रकल्पाचा पाहणी दौरा शुक्रवारी (ता. २७) माजी नगरसेवक तथा भाजप महामंत्री नीलेश म्हात्रे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह केला.
सानपाडा येथील सेक्टर-११ मधील भूखंड क्रमांक १वर सिडकोच्या १७७०.७३ चौमी क्षेत्रफळावर ही लायब्ररी नवी मुंबई महापालिकेमार्फत उभारली जात आहे. या प्रकल्पामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसेच वाचनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सानपाडा परिसरात मंदा म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. या पाहणी दौऱ्यावेळी विकास सोरटे, पांडुरंग आमले, प्रशांत देशमुख, विश्वनाथ लोकरे, अनुजा सासवडकर, हरेश बेरूर, मंगलदास कुवर, मुग्धा मुरंजन, सचिन हपनगौडर यांच्यासह अनेक अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या असणार सुविधा
१. इमारत बेसमेंट, तळमजला आणि चार मजले अशी असणार आहे. या लायब्ररीमध्ये पारंपरिक पुस्तकांसोबतच आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
२. ऑडिओ बुक्स, ई-लायब्ररी संकल्पना, पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग, रॅम्पसह व्ह्युइंग गॅलरी, पुस्तकांचा प्रवास दर्शविणारे प्रदर्शन, लँग्वेज लॅब, १३० आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह अशा विविध सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत.
३. विशेष म्हणजे दृष्टीहीन वाचकांसाठी ब्रेल विभागही उभारण्यात येणार असून, मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांतील साहित्य वाचकांना उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
सानपाडा हा कॉस्मोपॉलिटन भाग असल्याने येथे अशा प्रकारच्या सेंट्रल लायब्ररीची गरज होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हा प्रकल्प साकार होत असल्याचे नीलेश म्हात्रे यांनी सांगितले. मंदा म्हात्रे या विकासकामांवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लायब्ररीचे लोकार्पण होणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.