

वालधुनी नदीच्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पाच वर्षांत एकही रुपयाचा निधी नाही; माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : कल्याणची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वालधुनी नदीच्या स्वच्छतेबाबत शासन आणि प्रशासन किती गंभीर आहे, याचा पर्दाफाश एका माहिती अधिकारातून झाला आहे. गेल्या पाच वर्षांत या नदीसाठी एक रुपयाचाही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने सरकारकडे यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण उप-प्रादेशिक कार्यालयाकडून ही माहिती मिळवली आहे. गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधींकडून नदीच्या प्रश्नावर अत्यल्प पत्रव्यवहार झाला आहे. केवळ सुनील उतेकर आणि निशांत कांबळे यांची दोनच पत्रे रेकॉर्डवर आहेत. नदी स्वच्छतेसाठी कोणतेही स्वतंत्र अकाउंट हेड किंवा खाते उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे संवर्धनाच्या कामांसाठी आर्थिक तरतूदच शून्य आहे. खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळानेही शासनाकडे या ज्वलंत प्रश्नावर कोणताही पाठपुरावा केलेला नाही.
आंदोलनाचा इशारा
नदीच्या नावावर केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. प्रत्यक्षात ना निधी आहे, ना प्रशासनाची इच्छाशक्ती. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून प्रशासकीय निष्क्रियतेचा हा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी दिली. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. केवळ आश्वासने देणाऱ्या यंत्रणांविरोधात आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.