

अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर) : अंबरनाथच्या पूर्व व पश्चिम भागात बुलेट चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. सलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वेकडील कैलासनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी गुरुवारी (ता.२६) रात्री १० ते पहाटे ५ या दरम्यान चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी इमरान अफझल खान (वय २८) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही बुलेट ६० हजार रुपये किमतीची आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामध्ये तीन चोरटे दुचाकी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांनी त्या आधारे तपासाची दिशा ठरवली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
अशाच प्रकारची दुसरी घटना अंबरनाथ पश्चिम भागातील जयहिंद बँकेसमोर घडली. २४ मार्चला संजय दत्ताराम नाईक (वय ५०) यांनी आपली बुलेट ग्लोब बिझनेस पार्क परिसरात उभी केली होती. सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीत चोरट्यांनी तीन चोरून नेली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक लीला थोरात पुढील तपास करत आहेत. सलग दोन घटनांमुळे शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा आहे. नागरिकांनी वाहनांच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.