आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट;

आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट;
Published on

आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट
पूरक व्यवसायही अडचणीत ः व्यापारांमध्ये चिंतेचे वातावरण
जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : आंबा हंगाम सुरू होताच बाजार समित्यांमधील फळ बाजार गजबजून जातात. आंबा व्यापाऱ्यांसोबतच लाकडी पेट्या बनवणारे, पुठ्ठा पुरवठादार आणि आंबा पिकवण्यासाठी सुके गवत विक्रेते यांचीही मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र, यंदा आंबा उत्पादनात झालेल्या घटीमुळे या संपूर्ण साखळीवर परिणाम झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
दरवर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असते. त्यामुळे व्यापाऱ्यांची खरेदी-विक्री वाढून लाकडी पेट्या, पुठ्ठे आणि पिकवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, यंदा उत्पादन घटल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुठ्ठा व्यापाऱ्यांच्या मते, आंबा कमी आल्याने पॅकिंग साहित्याची मागणी घटली आहे. दरवर्षी या काळात मोठ्या ऑर्डर्स मिळतात, पण यंदा मागणी कमी असल्याने आमचा हंगामच धोक्यात आला आहे, असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. लाकडी पेट्या बनवणारे कारागीर आणि सुके गवत विक्रेत्यांनाही याचा फटका बसल्याने व्यवसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

लहान व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका
आंबा हंगाम हा केवळ फळ विक्रेत्यांसाठीच नव्हे, तर अनेक पूरक व्यवसायांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो. यंदा उत्पादन घटल्यामुळे संपूर्ण साखळीतील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com