

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार थकीत वेतन फरकाची रक्कम देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पी महासभेत महापौर शर्मिला पिंपोळलकर यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली.
महापालिकेने यापूर्वी वेतन फरकाची रक्कम पाच टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले असले, तरी उर्वरित हप्त्यांबाबत स्पष्टता नसल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. अखेर या प्रश्नावर तोडगा काढत तिसरा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाचा लाभ केवळ सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. तसेच ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या वेतन फरकाची रक्कम तीन हप्त्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभागृहनेते हणमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, येत्या ३० मार्चला संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर प्रतिसाद मिळाल्याने महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.