

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : कुख्यात गॅंगस्टर रवी प्रकाश ऊर्फ रवी सुल्या पुजारी (५७) याला वैद्यकीय कारणास्तव (अशक्तपणा) उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ठाणे न्यायालयाने त्याला शुक्रवारी पोलिस कोठडी राखून ३० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे २०१७ मध्ये १० कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी हस्तक पाठविले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याचदरम्यान १७ मार्चला बेंगळुरू (कर्नाटक) येथील पॅरॉपन्ना, अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर त्याला ठाणे विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. मात्र, शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वीच गुरुवारी (ता. २६) वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात असल्याने शुक्रवारी त्याची पोलिस कोठडी राखून ३० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे सरकारी वकील संजय मोरे यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.