

शहापूर, ता. २८ (वार्ताहर) : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली लोककल्याण सामाजिक संस्थेतर्फे शहापूरमध्ये भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा चेरपोली गावातील सावंत मैदानात २, ३ आणि ४ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे.
तीन दिवस चालणारी स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. विविध संघ यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक २५ हजार ५०० रुपये रोख, द्वितीय पारितोषिक १५ हजार ५०० रुपये रोख रक्कम देण्यात येणार असून इतरही पारितोषिकांची रेलचेल असणार आहे. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यांसाठी विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत. तसेच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. कुलर, मिक्सर आणि इस्त्री यांसारखी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे शहापूर तालुक्यात कबड्डी खेळाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.