

‘१५० सेवाकर्मी प्लस’मध्ये मुंबई विद्यापीठ अव्वल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार
मुंबई, ता. २८ ः १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. २८) मुंबई विद्यापीठाचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित होते.
प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये राज्यातील एकूण १३ अकृषी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई विद्यापीठाला एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक ८२ गुण मिळाले आहेत. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनातर्फे प्रशासकीय सुधारणा अंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला होता. या अनुषंगाने विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने शासनाच्या मूल्यांकनाच्या एकूण नऊ निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती, बिंदू नामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी नोंदणी व प्रशिक्षण आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटल करणे, अशा सर्व निकषांत मुंबई विद्यापीठाचे मूल्यमापन करून ८२ गुण बहाल करण्यात आले.
उद्दिष्टपूर्तींसाठी विशेष परिश्रम
६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला होता. राज्य शासनातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने मानव संसाधन विकास विभागाचे उपकुलसचिव डॉ. अशोक फर्डे आणि त्यांच्या चमूने या उद्दिष्टपूर्तींसाठी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.