

तळोजा-खोणी महामार्गावर लोखंडी रिंग कोसळली
डोंबिवली, ता. २८ : तळोजा-खोणी एमआयडीसी महामार्गावर शनिवारी (ता. २८) दुपारी एका अवजड वाहनातून लोखंडी रिंग रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. उसाटणे आणि नाऱ्हेण गावांच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे अवजड वाहतुकीतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ थोडक्यात टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अवजड वाहनातून लोखंडी प्लेटच्या रिंगची वाहतूक केली जात होती. सुरक्षेसाठी ही रिंग साखळीने बांधण्यात आली होती; मात्र प्रवासादरम्यान अचानक साखळी तुटली आणि ही जड रिंग थेट रस्त्यावर कोसळली. ही रिंग कोसळताना वाहनाच्या डिझेल टाकीवरून घसरत खाली पडली, ज्यामुळे टाकीलाही फटका बसला.
रिंग कोसळल्यामुळे वाहनातून डिझेलची गळती सुरू झाली; परिणामी सिमेंटच्या रस्त्यावर प्रचंड घसरण निर्माण झाली होती. या घटनेनंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे पोलिस शेखर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. घसरण थांबवण्यासाठी रस्त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
चालकावर दंडात्मक कारवाई
वाहतूक पोलिसांनी काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही रिंग बाजूला करून वाहतूक पूर्वपदावर आणली. सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनचालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तळोजा-खोणी मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठी असते. अनेकदा सामानाची नीट बांधणी न केल्याने असे अपघात घडतात. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अवजड वाहनांची तपासणी कडक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.