गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकांच्या अधिकाऱयांवर गुन्हा दाखल

गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकांच्या अधिकाऱयांवर गुन्हा दाखल
Published on

गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरण
----
‘एनसीबी’ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी मागितल्याचा ठपका

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. याप्रकरणी एनआरआय सागरी पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि नवी मुंबईतील अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एएनसी) बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, कोट्यवधी रुपयांची खंडणी मागणे, कुटुंबाला धमकावण्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील तपास अधिकाऱ्यांवरच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
एनसीबीचे अधिकारी आकाश मलिक आणि त्‍यांच्या पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता, २ फेब्रुवारी २०२५ रोजी चिंचकर यांच्या घरावर छापा टाकला. त्या वेळी घरातील कामगारालाही मारहाण करण्यात आली. या वेळी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर, दोन लाख रुपये रोख, महागडी घड्याळे व महत्त्वाची कागदपत्रे पंचनाम्याशिवाय नेल्याचा आरोप गुरुनाथ चिंचकर यांच्या पत्नी डॉ. किरण चिंचकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी चिंचकर यांच्या मुलांना खोट्या अमली पदार्थांच्या खटल्यात अडकवण्याची धमकी देऊन १० ते १५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा डॉ. चिंचकर यांनी केला आहे. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला कारागृहात टाकण्याची सतत भीती घातली जात होती.
दरम्यानच्या काळात नवी मुंबई एएनसीचे पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनीही एका गुन्ह्यासंदर्भात चिंचकर यांच्या कार्यालयात शिवीगाळ करीत पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. चिंचकर यांना वारंवार एनसीबी कार्यालयात बोलावून दिवसभर ताटकळत ठेवले जायचे. छळाला आणि खंडणीच्या दबावाला कंटाळून २५ एप्रिल २०२५ रोजी चिंचकर यांनी स्वतःच्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केली. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे लिहिली होती.
--------------
नैराश्यातून आत्महत्या!
पोलिसांच्या दाव्यानुसार, मृत गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा नवीन चिंचकर हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर असून तो थायलंडमध्ये हायड्रो गांजाचा पुरवठा करत होता. नवीन आणि धीरज चिंचकर हे दोघेही एनसीबी मुंबईच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होते. नेरूळ येथील एनडीपीएसच्या गुन्ह्यातही त्यांचे नाव आल्याने दोघे भाऊ फरार होते. त्यामुळे पोलिसांकडून गुरुनाथ चिंचकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com