

गटार पायवाटांमध्ये २,५६० कोटींचा घोटाळा!
श्वेतपत्रिका काढण्याची मृणाल पेंडसे यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडून गेल्या चार वर्षांत तब्बल चार हजार ९५३ कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला. मात्र त्यातील दोन हजार ५६० कोटी रुपये फक्त गटार आणि पायवाटांवर खर्च करण्यात आले. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली दिसत नाहीत, अशी शंका भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केली आहे. या कामांमध्ये गैरव्यवहार झाला असून, या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढून सखोल चौकशी करण्याची मागणीही पेंडसे यांनी शुक्रवारी (ता. २८) अर्थसंकल्पी सभेत केली.
ठाणे महापालिका अर्थसंकल्पी सभेत मृणाल पेंडसे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. आयुक्तांनी सादर केलेल्या ‘स्वप्नवत’ अर्थसंकल्पावर टीका करताना त्या म्हणाल्या, की ठाणेकर नागरिकांना सकाळी अंघोळीसाठी टँकर बोलवावा लागत असेल तर कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प काय करायचे आहेत? प्रथम ठाणेकरांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा, मग मोठमोठी स्वप्ने दाखवा, असा टोलाही पेंडसे यांनी लगावला. गेल्या तीन वर्षांतील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवरही त्यांनी घणाघात केला. या कामांची चौकशी झाली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आणि कडक भूमिका घेऊ, असा स्पष्ट इशारा मृणाल पेंडसे यांनी प्रशासनाला दिला.
.................................
पालिकेच्या मालमत्ता बोगस लाभार्थ्यांना
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता बोगस लाभार्थ्यांना देण्याचा सपाटा महापालिकेने लावला होता. त्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप पेंडसे यांनी केला. त्या घोटाळ्याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
......................
ठाणेकर शहराबाहेर फेकले जातील
शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर राज्य सरकारने सवलतींचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे शहरातील हाउसिंग स्टॉक वाढेल आणि घरांच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु परवडणाऱ्या घरांचे स्वप्न मूळ ठाणेकरांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. घरे परवडत नाहीत म्हणून मुंबईकर जसा मुंबईबाहेर फेकला गेला, तसा आता ठाणेकरही ठाण्याबाहेर फेकला जाईल, अशी भीती मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.