

पावसाळ्यात मलेरिया, डेंगीचा धोका वाढला
मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची कमतरता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात मलेरिया, डेंगी, लेप्टो आदी साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. औषध फवारणी आणि धूम्रफवारणी करण्यासाठी मशीनची कमतरता असून मनुष्यबळ अपुरे आहे. धूम्रफवारणीची एक मशीन तीन वॉर्डांत वापरतात, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका स्थायी समिती सदस्य ट्युलिप मिरांडा यांनी केला आहे.
भांडुप एस विभागात बांधकाम ठिकाणी औषध फवारणी व धूम्रफवारणीसाठी दिलेल्या कंत्राटाची मुदत ३१ मार्चला संपुष्टात येत आहे. तरी भांडुप एस विभागांत बांधकामाच्या ठिकाणी अळीनाशक फवारणी तसेच मूषक नियंत्रणासाठी ४ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या महिन्यांच्या कालावधीसाठी तुळजाभवानी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेस काम देण्यास महापालिका आयुक्त यांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला असता समिती सदस्यांनी आपली मते व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
एच पूर्व विभागात धूम्रफवारणी मशीनची कमतरता आहे. धूम्रफवारणी करणारे कर्मचारीच सांगतात, मशीनमधून धूर निघतो, याची स्पष्टता प्रशासनाने द्यावी. मलेरिया, डेंगीच्या नियंत्रणासाठी कुठल्या प्रकारचे केमिकल वापरतो, मुंबई महापालिकेच्या अखत्यारित २२७ प्रभाग असून २२७ प्रभागांसाठी मशीन का नाही मागवत, असा सवाल ट्युलिप मिरांडा यांनी या वेळी केला.
पावसाळ्यात मच्छरांचा त्रास वाढतो, पूर्वी दोन कामगार असायचे. एक धूम्रफवारणी तर दुसरा औषध फवारणी करीत असे; मात्र आता कंत्राटी पद्धतीवर औषध व धूम्रफवारणी करण्यात येत असून किती दिवस कंत्राटी कामगारांना घेऊन फवारणी करणार, असा सवाल सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला.
१० कोटींचा प्रस्ताव सादर होणार
कीटक नियंत्रणासाठी रोजंदारीवर बेरोजगार संस्थांना काम देण्यास २००८ पासून सुरुवात झाली. आजही शोल्डर मशीनद्वारे धूम्रफवारणी केली जात असून संपूर्ण मुंबईत औषध व धूम्रफवारणीसाठी १७ कोटींचा प्रस्ताव एप्रिल महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. अखेर सदस्यांच्या चर्चेनंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.