

गुजरात सीएनजी पंपावर छापा
पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांकडून कारवाई
नालासोपारा, ता. २८ (बातमीदार) : एलपीजी गॅस, सीएनजी, इंधन मिळविण्यासाठी ग्राहकांच्या सर्वत्र लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा गैरफायदा घेत नालासोपाऱ्यात गुजरात सीएनजी पंपावर रिक्षाचालकांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी संबंधित विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वसई पुरवठा निरीक्षण अधिकारी भागवत सोनार यांनी शुक्रवारी (ता. २७) या पंपावर स्टिंग ऑपरेशन केले. या वेळी पंप व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी सोनार यांना धक्काबुक्की केल्याने या प्रकरणी पाच जणांविरोधात पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित पंपाला सील ठोकण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समरनाथ पांडे, सुरेश रामलखन मिश्रा, बलदेव जवाहर यादव, राजू खडक, संदीप शर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी (ता. २७) धानिवबाग येथील गुजरात सीएनजी पंपावर रिक्षाचालकांकडून निर्धारित दरापेक्षा जादा पैसे घेतले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सोनार यांनी स्वतः रिक्षात बसून पंपावर जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. तेव्हा रिक्षाचालकांकडून प्रति गॅस भरण्यावर ३० ते ५० रुपये अतिरिक्त आकारले जात असल्याचे आढळले. कर्मचारी बलदेव यादव हा प्रत्यक्ष ५० रुपये जादा घेऊन सीएनजी भरत असल्याचेही निदर्शनास आल्याचे सोनार यांनी सांगितले.
----------
सोनार यांनी पंप मॅनेजर मिश्रा यांना जाब विचारला असता, त्यांनी अरेरावी करीत वाद घातला. यानंतर पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी सोनार यांना घेराव घालून बाहेर जाण्यास अडथळा निर्माण केला. दरम्यान, मॅनेजरने सोनार यांच्याशी धक्काबुक्की केली. या घटनेनंतर सोनार यांनी पेल्हार पोलिसांना कळवून घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी कर्मचारी बलदेव याच्याकडून ९६० रुपयांची रक्कम जप्त केली. चौकशीत जादा वसुलीची रक्कम मॅनेजर व कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जात असल्याचेही उघड झाले. तसेच पंपाचे मालक समरनाथ पांडे यांनाही या प्रकाराची माहिती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने संबंधित गुजरात सीएनजी पंप सील केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.