

वारली चित्रकाराचा सन्मान
ट्रायब्स ऑफ फेस्टमध्ये दोन लाखांचा पुरस्कार
कासा, ता. २९ (बातमीदार) : जनजातीय मंत्रालय, भारत सरकार, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि एफसीसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील श्रावण कोर प्लेस, केजी मार्गच्या आर्ट गॅलरीमध्ये १ ते १३ मार्चदरम्यान ‘ट्रायब्स ऑफ फेस्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात डहाणूतील वारली चित्रकार राजेश चैत्या वांगड यांचा सन्मान करण्यात आला असून त्यांना दोन लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
देशभरातील विविध राज्यांतील एकूण ७१ आदिवासी कलाकारांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. १,२०० ते १,५०० कलाकृती एकाच व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. भारत सरकारतर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारचे भव्य आदिवासी कला प्रदर्शन भरवण्यात आले होते. डहाणूतील ज्येष्ठ वारली कलाकार स्व. जिव्हाळा सोम्या मासे यांचे शिष्य असलेले राजेश वांगड यांना या प्रदर्शनासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ‘कणसरी’ (७×५ फूट) आणि ‘लग्नचौक’ (६×४ फूट) या दोन भव्य वारली चित्रकृती सादर केल्या. या चित्रकृती पारंपरिक पद्धतीने कपड्यावर लाल मातीचा आधार देऊन, तांदळाच्या पिठाचा रंग व बांबूच्या काडीचा (भराडी) वापर करून साकारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांच्या दोन्ही चित्रांची प्रदर्शनात विक्रीही झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील ७१ आदिवासी कलाकारांमधून उत्कृष्ट कलाकृती म्हणून राजेश वांगड यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांना दोन लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
----------
राजेश वांगड यांचा जन्म डहाणू तालुक्यातील गंजाड वांगडपाडा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण आचार्य विद्यालयात दहावीपर्यंत त्यांनी पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड होती. एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वारली चित्रकलेत विशेष प्रावीण्य मिळवले असून विविध स्पर्धांमध्येही त्यांनी यश संपादन केले आहे. आजपर्यंत राजेश यांनी दहा ते बारा देशांत फिरून विविध आर्ट गॅलरीमध्ये आपली चित्रे प्रदर्शित केली आहेत. तर अनेक पारितोषिकेही त्यांनी पटकावली आहेत. राजेश वांगड यांच्या या यशामुळे डहाणू तालुक्याचा तसेच पालघर जिल्ह्याचा गौरव झाला असून आदिवासी वारली कलेला राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळाल्याची भावना जनसामान्यांत व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.