

श्रीवर्धन किनाऱ्यालगत अनधिकृत टपऱ्यांचा सुळसुळाट
वनविभागकडून दुर्लक्ष
श्रीवर्धन, ता. २९ (वार्ताहर) : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यालगत वनविभागाच्या हद्दीत अनधिकृत टपऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संबंधित विभाग मात्र अद्यापही सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. मठाचा गवंड परिसर, बीच फेस्टिव्हल पॉईंट तसेच शासकीय विश्रामगृह मार्गालगत उभारलेल्या टपऱ्यांमुळे नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई कधी होणार, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
मठाचा गवंड येथील पार सर्कल ते बीच फेस्टिव्हल पॉईंट आणि शासकीय विश्रामगृह मार्गावरील स्मशानभूमीजवळील डांबरी रस्ता ते खेकडा पॉईंट हा संपूर्ण भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो. विशेष म्हणजे, या हद्दीचे फलक लावलेले असतानाही टपरी चालकांनी त्याच फलकासमोर व्यवसाय सुरू ठेवत नियमांना हरताळ फासला आहे.
वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वी नगरपरिषदेकडून टपरी चालकांकडून स्वच्छता कर आकारला जात होता. या करातून किनाऱ्याची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन केले जात होते. मात्र, ही जागा वनविभागाची असल्याने नगरपरिषदेला कर का द्यावा? या वादामुळे नगरपरिषदेला कर वसुली तात्पुरती थांबवावी लागली.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील चंबुळे यांनी वनविभाग, नगरपरिषद आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
चौकट :
रस्त्याच्या कामावरही पूर्वी आक्षेप
२०१९ साली शासकीय विश्रामगृह मार्गावरील कच्चा रस्ता डांबरीकरण करण्याचे नगरपरिषदेचे नियोजन होते. स्मशानभूमी व गणपती विसर्जन मार्ग असल्याने हा रस्ता पक्का होणे आवश्यक होते. यासाठी टाकण्यात आलेली खडी त्या वेळच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन आठ दिवसांत हटवण्याचे आदेश दिले होते.
नेत्याच्या हस्तक्षेपामुळे टपऱ्यांना अभय
२०२१ मध्ये एका टपरी चालकाने महिला सुरक्षारक्षकासोबत धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नगरपरिषद, पोलीस आणि वनविभागाने संयुक्त कारवाई करत सर्व अनधिकृत टपऱ्या हटवल्या होत्या. मात्र, एका राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे त्याच टपऱ्यांना पुन्हा अभय मिळाले. परिणामी, आज हेच टपरी चालक प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.