

टोकावडे, ता. २९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांबू कारागिरांवर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. ‘युद्धजन्य परिस्थिती’ व पेट्रोल टंचाईच्या अफवा पुढे करत व्यापाऱ्यांकडून टोपली खरेदी टाळली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी, टोपली व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
मुरबाड व शहापूर तालुक्यातील वडाची वाडी (एकलहरे), केव्हारवाडी, बांगारवाडी, गोरेगाव, बनाची वाडी, रामपूर, लाकूडपाडा आदी भागांतील ठाकूर समाजातील अनेक कुटुंबे बांबूपासून टोपल्या आणि विविध शोभेच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतात. आठवडाभर मेहनत घेऊन तयार केलेल्या टोपल्या विक्रीसाठी टोकावडे येथील शुक्रवारच्या आठवडी बाजारात आणल्या जातात. मात्र, सध्या बाजारात व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने अनेक कारागिरांना टोपल्या विक्री होत नसल्याने परत न्याव्या लागत आहेत.
व्यापारी पेट्रोल टंचाईच्या अफवा आणि युद्धामुळे वाहतूक खर्च वाढल्याचे कारण देत खरेदीपासून दूर राहत आहेत. त्यामुळे टोपल्यांना अपेक्षित दर मिळत नसून किमतीत मोठी घसरण झाली आहे. पूर्वी २०० ते २२५ रुपये दर मिळणाऱ्या मोठ्या टोपलीचा भाव सध्या १५० ते १६० रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे कारागिरांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळित झाले आहे. टोपल्या तयार करताना पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगांचा वापर करून आकर्षक डिझाईन करण्यात येते. बांबू खरेदी, रंगकाम व वाहतूक खर्च वाढलेला असतानाही विक्री घटल्याने कारागिरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. टोकावडे बाजारातून नाशिक, घोटी, संगमनेर, शिर्डी, सिन्नर, जुन्नर, ओतूर आदी ठिकाणी टोपल्या पाठवल्या जातात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत व्यापार मंदावल्याने या पारंपरिक व्यवसायावर संकट ओढवले आहे.
आम्ही अनेक वर्षांपासून टोपली बनविण्याचा व्यवसाय करत आहोत. पण सध्या व्यापारी युद्धाचे कारण सांगून टोपली खरेदी करत नाहीत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे.
- पांडुरंग दरवडा, बांबू कारागीर
टोकावडे : व्यापाऱ्यांची संख्या घटल्याने टोपली व्यवसाय संकटात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.