

मुद्रे येथील उद्यानाला मोकळा श्वास कधी?
अतिक्रमणामुळे उद्यानाची दुर्दशा
कर्जत, ता. २९ (बातमीदार) : कर्जत शहरातील मुद्रे खुर्द येथील उद्यानाची सध्या दुरवस्था झालेली आहे. शहरातील रस्त्यालगत असलेल्या या उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून उद्यान परिसरातच अनधिकृत टपऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या टपऱ्यांमुळे रस्तावरून हे उद्यान सहज दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
मुद्रे परिसरासह आसपासच्या भागातील नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी या उद्यानात येत असतात; मात्र उद्यानातील अनेक खेळणी सध्या खराब अवस्थेत असून मुलांचे आकर्षण असलेली टॉय ट्रेनही बंद पडली आहे. त्यामुळे उद्यानाची अवस्था ‘आगगाडी’वरून ‘ढकलगाडी’ झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
कर्जत नगर परिषद हद्दीत दहिवली येथे जिजाऊ उद्यान, छत्रपती शिवाजीनगर भागात दोन उद्याने, नाना मास्तरनगर परिसरात एक आणि मुद्रे खुर्द येथे एक अशी साधारण पाच उद्याने आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या गुंडगे आणि भिसेगाव परिसरात एकही उद्यान नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.
मुद्रे खुर्द येथील उद्यान मुख्य रस्त्यालगत असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो; मात्र उद्यानासमोरच मुख्य रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे उद्यान रस्त्यावरून दिसेनासे झाले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून उद्यानाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे; मात्र प्रत्यक्षात ही कारवाई कधी होणार आणि कर्जत शहरातील उद्यानांना पुन्हा मोकळा श्वास कधी मिळणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----
सहाय्यक नगररचना अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी करून अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार येईल. तसेच येत्या काळात शहरातील सर्व उद्यानांची स्वच्छता आणि अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येईल.
- तानाजी चव्हाण, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद