पावसाळ्यात सिडको प्रशासन सज्ज! १

पावसाळ्यात सिडको प्रशासन सज्ज! १
Published on

पावसाळ्यात सिडको प्रशासन सज्ज
१ जूनपासून २४ तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सिडको महामंडळाने आतापासूनच कंबर कसली आहे. १ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सिडको कार्यक्षेत्रात २४x७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, नागरी समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर २०१८ पासून राबवण्यात येणारी ही यंत्रणा यंदा अधिक सुसज्ज करण्यात येणार आहे. नुकतीच सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या दालनात विभाग प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये आपत्ती निवारणासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला.
सिडकोच्या आपत्ती व्यवस्थापनमध्ये नियंत्रण कक्षासाठी व्हॉट्सॲप ग्रुप, सीसीटीव्ही आणि एकमेकांशी संपर्कासाठी वॉकीटॉकीची सोय करण्यात आली आहे. नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सिडकोचे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, असे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियोजित बैठकीस मुख्य अभियंता प्रभाकर फुलारी, मुख्य अभियंता शीला करुणाकरण, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, सुरक्षा अधिकारी के. ए. गायकवाड यांच्यासह विद्युत, प्रणाली आणि आस्थापना विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी सिडकोने प्रसिद्ध केलेल्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिडकोकडून उपाययोजना
आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी रुग्णवाहिका आणि खाटांची उपलब्धता ठेवण्यासाठी रुग्णालयांशी समन्वय साधला जात आहे. पाणी साचणाऱ्या सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी हाय-पॉवर पंप तैनात केले आहेत. रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गांत पाणी साचू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अग्निशमन दलाचे मनुष्यबळ, उपकरणे आणि वाहने सज्ज ठेवली असून, गरज भासल्यास नागरिकांच्या बचावासाठी बोटींचीही व्यवस्था देखील केली आहे. त्याशिवाय शॉर्ट सर्किटच्या घटना हाताळण्यासाठी महावितरणशी समन्वय राखला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com