

तिसऱ्या मुंबईला ग्रामस्थांचा विरोध
ड्रोन सर्वेक्षणासाठी उभारलेले मंच ग्रामस्थांनी पेटवले
उरण, ता. २९ (बातमीदार)ः उरण, पनवेल आणि पेण या तालुक्यांत तिसरी मुंबई उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रस्तावित नवीन मुंबईत १२४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. बाधित गावांतील भूखंडाच्या मोबदल्याबाबत तेथील स्थानिकांना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप होत आहे. या तिसऱ्या मुंबईसाठी ड्रोन सर्वेक्षण होत असून, त्यासाठी ठिकठिकाणी मंच उभारण्याचे काम सुरू असताना ग्रामस्थांनी आज याला विरोध करीत ड्रोनसाठी उभारलेले मंच पेटवले.
उरण, पनवेल आणि पेण या तालुक्यांतील गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने केएससी नवनगर नावाने तिसरी मुंबई उभारली जाणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने फसवी साडेबावीस टक्क्यांची योजना जाहीर केली आहे. मात्र आधीच्या सिडको आणि नवी मुंबईच्या विकसित भूखंड देण्याच्या अत्यंत वाईट अनुभवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी सरकारने दाखविलेले हे गाजर यापूर्वीच धुडकावून लावले आहे. प्रकल्पाला विरोध असल्याबद्दल अनेक निवेदनेदेखील यापूर्वी केएससी नवनगरविरोधी शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. २५ हजार हरकतीही नोंदविल्या आहेत. असे असतानाही राज्य शासनाने ड्रोनद्वारे जमिनीचा सर्व्हे करण्याची तयारी सुरू झाली आहे.
सर्व्हे कंपनीने काळे-पिवळे पट्टे गावोगावी मारायला सुरुवात केली आहे. आधीच शेतकऱ्यांच्या विरोधाची सरकारकडून कोणतीही दखल घेतली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या चिरनेर, खोपटा, गोवठणे, सारडे येथील शेतकऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले. सज्जड दमही दिला. तसेच काळ्या-पिवळ्या पट्ट्यांचे मंच पेटवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.