

आंबा उत्पादनास प्रोत्साहन देईन
आयसीटीचे कुलपती पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी यांचे प्रतिपादन
मुंबई, ता ३१ : मी आतापर्यंत बांबू, ऊस आणि सोयाबीनसारख्या शेतीपिकांच्या उत्पादनवाढीसाठी संशोधन केले आहे, पंरतु अद्याप आंबा उत्पादनवाढीच्या विषयाला हात घातलेला नाही. पण मी नक्कीच याबाबत संशोधन करत आंबा उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देईन, असा विश्वास रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलपती प्रा. जे. बी. जोशी यांनी व्यक्त केला.
आयसीटी येथे मंगळवारी (ता. ३१) महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने हवामान बदल, कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, मार्केटिंग फूड, गुंतवणूक, सौरऊर्जा आदी विषयावर परिषद आयोजित केली होती. त्या वेळी प्रा. जोशी यांनी परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थितांना संबोधित केले. या वेळी राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल स्वागताध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीटीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक गिरीश थॉमस, कृषी विभागाचे सहसंचालक शिवाजी आमले, संघाचे उपाध्यक्ष संदेश पाटील आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात सिद्धेश्वर ॲग्रोटेकचे प्रदर्शन ही सुरू करण्यात आले.
आंब्याच्या शेती व विक्रीसंदर्भात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल विक्रीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम मी करेन. तसेच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुठल्या देशात आंब्याला चांगली बाजारपेठ आणि मोठी मागणी आहे, हेदेखील शेतकऱ्याला कळेल, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. दरम्यान, आपण अनेक कारखाने आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात परदेशातून भरपूर गोष्टी आणतो. केवळ आपल्या देशात या उपकरणांची जोडणी होते. यामुळे आपण ज्ञानाच्या क्षेत्रात परदेशी मालावर अवलंबून राहतो, हेच आपल्या गरिबीचे कारण असल्याचेही जोशी यांनी सांगितले. आयसीटीचे कुलगुरू प्रा. पंडित यांनी देशामध्ये असलेल्या शीतगृहांची यंत्रणा मोठ्या प्रमाणात असतानाही २५ टक्के उत्पादने वाया जातात असे सांगत, देशात प्रगतिशील शेतकरी हे अल्प प्रमाणात असल्यामुळे नवीन प्रयोग करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे असे त्यांनी सांगितले. गुजराती माणूस हा शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहता, हीच मानसिकता आपणही ठेवली पाहिजे, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतिशील होण्यासाठी मदत मिळेल, असेही मत प्रा. पंडीत यांनी या वेळी व्यक्त केले. या परिषदेत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शेतीला पूरक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देणारे सादरीकरण विविध कंपन्याच्या वतीने करण्यात आले. यात प्लॅनेट आय फॉर्म एआय लिमिटेड, टाटा मोटर्स, सेक्युरेशन, एचयूआरएल, टाटा पॉवर इत्यादी महत्त्वाच्या कंपन्यांचा समावेश होता.
----------------
आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंब्याचे उत्पन्न हे ४० टक्क्यांवरून कमी होत आता फक्त १० टक्क्यांच्या जवळपास आले असल्याची माहिती आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली. याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने अहवालही दिला आहे. दरवर्षी उत्पादन झालेल्या आंब्याची १५ टक्के निर्यात होते. मात्र, यंदा उत्पादन कमी झाले असून, आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याचे मोकल यांनी सांगितले. आंबा उत्पादकांसमोर टेरिफचे संकटही आहे. अडीच लाख हेक्टरमध्ये कोकणात आंबा उत्पादन होत असताना शासनाची अत्यंत तुटपुंजी मदत आंबा उत्पादकांना मिळत असून त्यात वाढ झाली पाहिजे, अशी मागणी या वेळी मोकल यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.